मुंबई : घाटकोपरमधील एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणाऱ्या तरूणाला गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने नाट्यमयरित्या तपास करून अटक केली. आरोपीचा माग काढण्यााठी तब्बल ३५० सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासण्यात आले. चोरी करण्यापूर्वी आरोपीने एका तरुणीला लिफ्ट दिली होती. तो दुवा पकडून पोलिसांनी आरोपीला पुण्याहून अटक केली.
घाटकोपर येथील भटवाडीत राहणाऱ्या रंजना घुटूकडे २० मे रोजी रस्त्याने पायी जात असताना एका अज्ञात मोटारसायकलस्वाराने त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी खेचली. सोनसाखळी चोरताना आरोपीने महिलेला जोरात ढकलले आणि घुटूकडे गंभीर जखमी झाल्या. या प्रकरणात घाटकोपर पोलीस ठाण्यात कलम ३०९ (६) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाच्या तपासासाठी परिमंडळ ७ आणि घाटकोपर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांचे एक संयुक्त पथक स्थापन करण्यात आले होते.
मैत्रीणीला लिफ्ट दिल्याने अडकला…
सोनसाखळी चोरीची घटना संध्याकाळी ७ वाजता घडली. ज्या ठिकाणी घटना घडली तेथे सीसी टीव्ही कॅमेरे नव्हते. त्यामुळे आरोपीला पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान होते. पोलिसांनी घटनेपूर्वी दुचाकीस्वार ज्या मार्गाने आला तेथील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासण्यास सुरवात केली. सुमारे ३५० हून अधिक कॅमेऱ्यांतील चित्रण तपासल्यानंतर पोलिसांना एक धागा सापडला. संध्याकाळी ५ च्या सुमारास हा दुचाकीस्वार पंतनगरच्या अदानी रिॲल्टर्स जवळील कॅमेऱ्यात दिसला. त्याच्या दुचाकीवर एक तरुणी बसली होती. तेथून हा दुचाकीस्वार घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या दिशेने जाताना दिसला. पोलिसांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाच्या आधारे त्याचा माग काढला. मात्र ही तरुणी स्थानकाजवळ उतरली आणि एका रिक्षात बसली. पोलिसांनी त्या रिक्षाचा शोध सुरू केला. कॅमेऱ्यात रिक्षाचा क्रमांक मिळाला होता. रिक्षा भटवाडी येथे गेली. पोलिसांचे पथक भटवाडी येथे पोहोचले आणि स्थानिक पातळीवर तपास करून त्या तरुणीला शोधून काढले. तिने दुचाकीस्वार आकाश लोखंडे तिच्या शाळेतील वर्गमित्र असल्याचे सांगितले. मी जात असताना त्याने मला घराजवळ सोडतो असे सांगितल्याने मी त्याच्या दुचाकीवर बसले अशी माहिती तिने दिली. तिने आकाश लोखंडेबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांचे काम सोपे झाले. चोरी केल्यानंतर आरोपी आकाश लोखंडे पुण्याला पळून गेला होता. पोलिसांच्या पथकाने तळेगाव येथून त्याला शोधून काढले आणि अटक केली.
याबाबत माहिती देताना घाटकोपर पोलिसांनी सांगितले की, आरोपी विशाल लोखंड मुलींवर पैसे खर्च करायचा, तसेच त्यांना महागड्या हॉटेलात न्यायचा. मुलींवर प्रभाव टाकण्यासाठी त्याने दीड लाखांची महागडी दुचाकी घेतली होती. परंतु या प्रयत्नात तो कर्जबाजारी झाला होता. त्यासाठी त्याने मित्राकडून पैसे उसने घेतले होते. पैसे परत कण्यासाठी मित्राने तगादा लावला होता. त्यामुळे झटपट पैसे कमवण्यासाठी त्याने सोनसाखळी चोरण्याचा निर्णय घेतला. तो २० मे रोजी चोरी करण्यासाठी निघाला. वाटेत त्याला त्याची शाळेतील वर्गमैत्रीण भेटली. चोरी करण्यासाठी जाण्यापूर्वी त्याने तिला लिफ्ट दिली. त्याच मैत्रीणीमुळे तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख, पोलीस निरीक्षक दिपाली कुलकर्णी (गुन्हे) सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास तिरमारे,सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर खरमाटे, पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग साळुंखे, सचिन क्षीरसागर (घाटकोपर) सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन झाडे (पार्कसाईट), सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील (मुलुंड), पोलीस उपनिरीक्षक सानप (भांडुप), पोलीस उपनिरीक्षक (पंतनगर) आदींच्या पथकाने कारवाई करून आरोपीला अटक केली.