मुंबई : मुंब्रा दुर्घटनेबाबत ठाणे रेल्वे पोलिसांनी मध्य रेल्वेच्या अभियंत्याविरोधात चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंदवला, असा दावा करत गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाच्यावतीने (सीआरएमएस) सीएसएमटीत गेल्या आठवड्यात आंदोलन करण्यात आले होते. यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली. तसेच प्रवाशांना झालेला मनस्ताप यामुळे सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी बुधवारी रात्री सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे पदाधिकारी आणि आंदोलकांवर गुन्हा दाखल केला.

जून २०२५ मध्ये मुंब्रा दुर्घटनेत पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, तर नऊ प्रवासी जखमी झाले. या घटनेबाबत ‘व्हीजेटीआय’ने दिलेल्या अहवालानुसार आणि तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासानुसार, ठाणे रेल्वे पोलिसांनी १ नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंता समर यादव आणि सहाय्यक विभागीय अभियंता विशाल डोळस यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले. हे गुन्हे मागे घेण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने ६ नोव्हेंबर रोजी सीएसएमटी स्थानकात आंदोलन केले, या आंदोलनाचा परिणाम लोकलची सेवा आणि प्रवाशांवर झाला. मोटरमन, व्यवस्थापकांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मोटरमन, लोकल व्यवस्थापकांना डांबून ठेवण्यात आल्याने, त्यांना कर्तव्यावर जाता आले नाही. परिणामी, लोकल सेवा एक तास बंद होती.

सीआरएमएस संघटनेला मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या रेल्वे विभागीय व्यवस्थापकांच्या (डीआरएम) कार्यालयासमोर आंदोलन करण्यास परवानगी दिलेली असताना, संघटनेचे पदाधिकारी व सदस्य हे मीलन सभागृह येथे जमले होते. यात सीआरएमएस संघटनेचे प्रमुख प्रवीण वाजपेयी व त्यांच्यासह इतर १०० ते २०० आंदोलक सहभागी होते. आंदोलन संपल्यावर सीआरएमएस संघटनेचे पदाधिकारी एस. के. दुबे आणि विवेक सिसोदिया यांच्यासह इतर ३० ते ४० आंदोलक हे अचानकपणे डीआरएम कार्यालयाकडून मोटरमन दालनाबाहेर आले. तेथे घोषणाबाजी करत मोटरमनला दालनाबाहेर येण्यास अडथळा निर्माण केला. त्यामुळे लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली.

याप्रकरणी सीएसएमटी रेल्वे पोलिसांनी सीआरएमएसचे पदाधिकारी एस.के.दुबे, विवेक सिसोदिया आणि इतर आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झाली नाही. हे गुन्हे फक्त आंदोलनाशी संबंधित असून सँडहर्स्ट रोड स्थानकादरम्यान झालेल्या दोन मृत्यूंशी या गुन्ह्याचा संबंध नसल्याची माहिती एका रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने दिली.

याप्रकरणी विभागीय चौकशी झाल्यावर त्याचा अहवाल लवकरच येईल. प्रवाशांना अडचण होईल असे प्रकार करणे किंवा लोकल थांबवणे चुकीचे आहे.- डॉ. स्वप्निल नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे