लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असून या स्थानकावरून दररोज सरासरी ११ लाख प्रवासी प्रवास करतात. मंत्रालय, महापालिका, मोठ्या बाजारपेठा, बंदरे, शासकीय व खासगी कार्यालये या ठिकाणी असल्याने कार्यालयीन वेळांमध्ये या स्थानकात प्रवाशांची प्रचंड वर्दळ असते. तसेच येत्या काळात कुलाबा – सीप्झ – वांद्रे मेट्रो ३ चे प्रस्तावित स्थानक सीएसएमटी परिसरात उभे राहणार आहे. त्यामुळे या भागात गर्दीचा लोंढा वाढणार असून अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी मेट्रो ३ चे प्रस्ताविक सीएसएमटी स्थानक सध्याच्या मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकाशी भुयारी मार्गाने जोडण्याचे नियोजन आहे.

पूर्वी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकात येण्यासाठी प्रवाशांना रस्ता ओलांडून यावे लागत होते. त्यामुळे वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडचणी येत होत्या. त्यानंतर या ठिकाणी भुयारी मार्ग उभारण्यात आला आणि हजारीमल सोमाणी मार्ग, महापालिका मार्ग आणि दादाभाई नौरोजी मार्ग येथून सीएसएमटी स्थानकात जाण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र गर्दीच्या वेळी या भुयारी मार्गात प्रचंड वर्दळ असते. तसेच फेरीवाल्यांनी हा भुयारी मार्ग व्यापल्याने प्रवाशांना येथून चालणे कठीण होते. मार्च २०२३ पासून हिमालय पूल प्रवाशांसाठी खुला झाला असून या मार्गावर देखील प्रवाशांची गर्दी असते. मात्र, येत्या काळात मेट्रो ३ चे स्थानक झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील गर्दीचा लोंढा सीएसएमटी परिसरात वाढणार आहे. त्यामुळे सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक १ आणि हिमालय पुलाजवळ नवीन भुयारी मार्ग बांधण्याची योजना आहे. रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाने या प्रस्तावाबाबत मध्य रेल्वे प्रशासनाला कळवले आहे.

आणखी वाचा-गिरगावमधील २०० वर्षे जुने विठ्ठल-रूक्मिणी मंदिर : मंदिराला पुरातन वारसा स्थळाचा दर्जा देण्याचा चेंडू केंद्र- राज्य सरकारच्या कोर्टात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेल्वे जमीन विकास प्राधिकरण, राज्य सरकार, मध्य रेल्वे अधिकारी आणि मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन (एमएमआरसीएल) यांनी गर्दीच्या नियोजनासाठी भुयारी मार्गाचा पर्याय निवडला आहे. हा भुयारी मार्ग ३५० मीटर लांबीचा आणि १८ मीटर रुंदीचा असल्याची शक्यता आहे. तसेच सीएसएमटी फलाट क्रमांक १ पासून मेट्रो स्थानकाला जोडणारा भुयारी मार्ग हिमालय पूल, किल्ला कोर्ट, आझाद मैदानाच्या दिशेने जाईल. या भुयारी मार्गात हवा खेळती राहण्यासाठी जागोजागी डक्ट काढण्यात येणार आहेत. तसेच उच्च क्षमतेचे एक्झॉस्ट फॅन लावण्याचे नियोजन आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. यासह सध्याचा सीएसएमटी इमारतीपासून – पालिका मुख्यालयाकडे जाणारा भुयारी मार्ग आझाद मैदानातील मेट्रो स्थानकापर्यंत वाढण्यात येणार आहे. त्यामुळे दोन्ही भुयारी मार्गावरील गर्दीचा लोंढा विभाजित करण्याचा प्रयत्न आहे.