मुंबई: मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे सीएसएमटी यार्डमध्ये पाणी भरले. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील यार्डमध्ये पाणी भरल्याने, लोकल सेवा कोलमडली आहे. फलाट क्रमांक ५, ६, ७ आणि १० ते १८ वरील लोकल सेवा आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांवर परिणाम झाला आहे. तसेच फलाट क्रमांक ३ येथे पाणी साचले आहे. त्यामुळे लोकल सेवा खोळंबली आहे.
मध्य रेल्वेची मुख्य मार्गिका सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली. तर, पश्चिम रेल्वेच्या सर्व मार्गिका सुरळीत सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
आसनगाव वरून सुटलेली लोकल कल्याणपर्यंत चालवण्यात आली. त्यानंतर ती लोकल कल्याण येथे रद्द करून, कसारा विशेष लोकल म्हणून चालवण्यात आली.
प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेठीस धरले आहे. तसेच आसनगावरून सुटलेली लोकल बराच वेळ कळवा येथे उभी आहे. यासह कुर्ला, घाटकोपर येथे लोकल एका मागे एक अडकल्या आहेत, असे प्रवाशांनी सांगितले.