मुंबई : दिवाळीनिमित्त विविध सवलती, आकर्षक भेटवस्तू, कमी व्याजदरात कर्ज देण्यात येत असल्याने वाहन खरेदी तेजीत आहे. सरकारने वस्तू आणि सेवा (जीएसटी) करामध्ये कपात केल्याने वाहन खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. दिवाळीनिमित्त मुंबई शहर आणि उपनगरांत दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणावर वाहन खरेदी होईल, असा विश्वास वाहन वितरक व्यक्त करीत आहेत.
वाहन खरेदी आणि नोंदणीला सुरुवात झाली असून, अनेकांनी वसुबारस आणि धनत्रयोदशीला वाहने खरेदी केली. छोट्या चारचाकी वाहनांवर जीएसटी कमी केल्याने ग्राहकांना सर्वाधिक फायदा झाला. जीएसटी करात कपात केल्याने चारचाकी वाहनासाठी ५० हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत आणि दुचाकी वाहनांच्या दरात १० ते १५ हजारांपर्यंत किमतीत घट झाली. यापूर्वी १२०० सीसी आणि ४ मीटरपेक्षा कमी लांबीच्या पेट्रोल आणि सीएनजी चारचाकीवर २८ टक्के जीएसटी आणि १ टक्के सेस आकारला जात होता. म्हणजेच एकूण २९ टक्के कर होता, जो सरकारने १८ टक्के केला. ३५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकींवरील जीएसटी दर २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी केला. त्यामुळे चारचाकी आणि दुचाकी खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल आहे.
वडाळा प्रादेशिक परिवहन कार्यालयात यंदा वसुबारस आणि धनत्रयोदशीला ८७४ वाहनांची नोंदणी झाली.
बोरिवली कार्यालयात १,०३२ वाहनांची नोंदणी झाली.
गेल्या वर्षी हीच संख्या ४९९ इतकी होती.
गेल्या वर्षीपेक्षा प्रतिसाद
ताडदेवमध्ये १३ ऑक्टोबर ते १८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत २,१६० वाहनांची नोंदणी झाली. गेल्या वर्षी २४ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर या कालावधीत १,९१८ वाहनांची नोंदणी झाली. लक्ष्मीपूजन आणि भाऊबीजेला वाहन विक्रीत वाढ होईल, असा विश्वास वाहन वितरकाने व्यक्त केला.
नागरिकांचा वाहन खरेदीकडे कल आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळीत दुचाकी, चारचाकी वाहनांची खरेदी जास्त झाली आहे. पुढील संपूर्ण आठवडाभर वाहन खरेदीचा जोर असेल. – अनिल वळीव, प्रादेशिक परिवहन अधिकारी, बोरिवली