मुंबई : सीमा शुल्क विभागाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर केलेल्या कारवाईत बँकॉकहून आलेल्या दोन प्रवाशांकडून सव्वा आठ किलो गांजा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सव्वा आठ कोटी रुपये आहे. दोेन्ही आरोपींविरोधात सीमाशुल्क कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बँकॉकहून येणारे संशयीत प्रवासी तेथून गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे शनिवारी बँकॉकहून आलेल्या सागर वधीया व निगम रावल या प्रवाशांना थांबवण्यात आले. त्यांच्या अंगझडतीत संशयीत अमलीपदार्थ सापडला.

त्यानंतर त्यांचे सामान तपासले. त्यावेळी सामानातील पाकिटांमध्ये संशयी अमलीपदार्थ सापडले. तपासणीत तो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. सागरकडून चार किलो ६९ ग्रॅम गांजा, तर रावलकडून चार किलो ८९ ग्रॅम असा दोघांंकडून मिळून एकूण आठ किलो १५५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याची किंमत सव्वा आठ कोटी रुपये असल्याची माहिती सीमाशुल्क अधिकाऱ्याने दिली. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.आरोपींनी यापूर्वीही अशाप्रकारे गांजाची तस्करी केल्याची माहिती मिळाली आहे. दोघांनी यापूर्वीही दोनवेळा अशा प्रकारे गांजाची तस्करी केली असून या प्रकरणामागे आंतरराष्ट्रीय अमलीपदार्थ तस्करांच्या टोळीचा सहभाग असल्याचा सीमाशुल्क विभागाला संशय आहे. दरम्यान याप्रकरणी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आले. याप्रकरणात सहभागी असलेल्या काही संशयितांची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली असून त्याद्वारे सीमाशुल्क अधिकारी अधिक तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण अमेरिका खंडातील देशांमधून मोठ्याप्रमाणात या गांजाची निर्मिती केली जाते. त्यानंतर विविध मार्गांनी जगभरात त्याचे वितरण होते. गेल्या काही महिन्यांपासून बँकॉक मार्ग मोठ्याप्रमाणात गांजाची तस्करी केली जात असल्याचे दिसून आले आहे. भारतातून थायलंडमध्ये मोठ्याप्रमाणात पर्यटकांचे जाणे-येणे असते. त्यामुळे या मार्गावर मोठ्याप्रमाणात विमानांची ये-जा असते. त्यामुळे बँकॉकमार्गे भारतात गांजाची तस्करी होत आहे. या तस्करीत भारतीय टोळ्यांचाच सहभाग असल्याची प्राथमिक माहिती आहे. गेल्या वर्षभरापासून बँकॉकहून गांजाची तस्करीप्रकरणी ३० हून अधिक व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. सर्व गांजा दक्षिण अमेरिकीतील असल्याचा संशय असून तो गांजा उच्च प्रतिचा आहे. त्यामुळे त्याला अधिक मागणी असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.