मुंबई : सध्या ‘आभासी कैद’ अर्थात ‘डिजिटल अरेस्ट’ चे गुन्हे वाढले आहेत. सायबर भामटे पोलीस असल्याची बतावणी करून ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नागरिकांकडून लाखो रुपये उकळत आहेत. एका तरुणाने याच संधीचा फायदा घेऊन अशाच प्रकारे आभासी कैद करून एका निवृत्त व्यक्तीची ६८ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. यासाठी त्याने युट्यूबवरून खास प्रशिक्षण घेतले होते.
वसईच्या अंबाडी रोड येथे राहणारे ६२ वर्षीय फिर्यादी डॉकर्याड शिपिंग कंपनीतून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांना जुलैमध्ये एक निनावी क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून व्हिडियो कॉल केला. समोर पोलीस स्थानकाचा देखावा तयार करण्यात आला होता. तेथे पोलिसांच्या गणवेषात असलेल्या सायबर भामट्याने फिर्यादींना मनी लॉंड्रींगच्या गुन्ह्यात अटक करण्याची धमकी दिली. फिर्यादी जाळ्यात अडकल्यावर त्या भामट्याने विविध बँक खाती देऊन त्यात ६८ लाख रुपये भरण्यास सांगितले होते. नंतर ही फसवणूक असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
दोन तरुणांना अटक
याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी तपास सुरू केला होता. दोन बँक खात्यात पैसे हस्तांतरित झाले होते. त्या दोन बॅंक खातेधारकांना अटक करण्यात आली. वैभव काळे (२१) आणि रितेश वाघमारे (२२) अशी या तरुणांची नावे असून ते संभाजीनगरमध्ये राहणारे आहेत. या दोघांच्या बॅंक खात्यावर फसवणुकीचे पैसे वळवण्यात आले होते. मात्र आपल्या खात्यात पैसे कसे आले आणि काय गुन्हा झाला याची माहिती नव्हती. तपासात एक वेगळेच कारण समोर आले. या गुन्ह्यात एक वेगळाच तरुण मुख्य आरोपी असल्याचे समजले. त्याने मित्रांची दिशाभूल करून बॅंक खात्यांचे तपशील आणि वापर करण्याची परवानगी घेतली होती.
यूट्युबवरून ‘डिजिटल अरेस्ट’चे प्रशिक्षण
सध्या डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सहज फसवणूक करून लाखो रुपये मिळवता येतात. हे या तरुणाला माहीत होते. त्यामुळे त्याने हा प्रयत्न करून पाहिला. मित्रांचे बॅंक खाते मिळवल्यावर त्याने यूट्यूब मधून ‘डिजिटल अरेस्ट’ कशी करतात ते शिकून घेतले आणि सहज एका व्यक्तीला फोन केला. हा फिर्यादी त्याच्या जाळ्यात अडकला आणि ६८ लाख रुपये गमावून बसला. मुख्य आरोपीचा आम्ही शोध घेत आहोत, असे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिलाल जाधव यांनी सांगितले. आरोपीचा शोध सुरू आहे. त्याची माहिती मिळाली असून लवकरच त्याला अटक केली जाईल, असेही जाधव यांनी सांगितले.