मुंबई : खासगी मिनी बसची बेस्ट बसगाडीला धडक होऊन झालेल्या अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू आणि सहा प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री दादर प्लाझा येथील बस थांब्यावर घडली. या बेस्ट बस अपघाताप्रकरणी आरटीओच्या पथकाने तपासणी केली. आरटीओच्या तपासणीनुसार अपघाताला बेस्ट बस किंवा मिनी बसमधील तांत्रिक बिघाड कारणीभूत नसल्याचे समोर आले आहे. मिनी बसच्या चालकांच्या चुकीमुळे हा अपघात झाला असावा, असे प्राथमिक अहवालात समोर आले आहे.
बेस्ट मार्ग क्रमांक १६९ वरून रविवारी रात्री ११ च्या सुमारास बस धावत होती. ही बस वरळी आगारातून प्रतीक्षा नगर आगाराकडे जात होती. रात्री ११.३० च्या सुमारास बस प्लाझा बस थांब्याजवळ येत असताना, दादर टी.टी.कडून शिवाजी पार्कच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एका खासगी मिनी बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि मिनी बसने थेट बेस्ट बसच्या समोरील चाकाला जोरात धडक दिली. यामुळे बस अनियंत्रित होऊन थेट डावीकडे गेली.
त्यामुळे थांब्यावर उभ्या असलेले ७ प्रवासी जखमी झाले. त्यापैकी एक प्रवासी शहाबुद्दीन (३७) यांचा लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये इतर २ वाहनांचे नुकसान झाले. तसेच या अपघातात बसचे पुढील चाक तुटले, समोरील काचही फुटली. निष्काळजीपणे भरधाव वेगाने वाहन चालविल्याने अपघात झाल्याप्रकरणी खासगी मिनी बसचा चालक संजय कुंभार (२७) विरुध्द शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, बेस्ट बसगाडीच्या बसचालकाविरुध्द कोणत्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नाही. दरम्यान, दोन्ही बसची तपासणी आरटीओच्या पथकाने केली. यावेळी दोन्हीही बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नसल्याचे स्पष्ट झाले, अशी माहिती ताडदेव आरटीओमधील अधिकाऱ्यांनी दिली.