मुंबई : दादरच्या कबुतरखाना परिसरात शिवसेनेने लावलेले जाहिरात फलक सध्या चांगलेच चर्चेत आहेत. जैन धर्मियांत महत्व असलेल्या पर्युषण पर्वाच्या शुभेच्छा देणारे शिवसेनेचे जाहिरात फलक सध्या दादरमधील मराठी माणसाचे लक्ष वेधून घेत आहे. मराठी माणसांचे दादर बदलत असल्याचाच हा पुरावा असल्याची चर्चा आहे.
दादरचा कबुतरखाना हा परिसर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दादरचा कबुतरखाना बंद केल्यामुळे या ठिकाणी जैन समुदाय प्रचंड आक्रमक झाला व या समुदायाने मोठे आंदोलन केले. त्यानंतर कबुतरखाना बंदीच्या समर्थनार्थ मराठी एकीकरण समितीनेही मोर्चा काढला. त्यामुळे जैन विरुद्ध मराठी असा वाद रंगला होता. अद्यापही कबुतरखाना बंदीचा वाद संपलेला नाही. सध्या जैन धर्मियांचा सण असलेला पर्युषण काळ सुरु आहे. २० ते २७ ऑगस्ट या कालावधीत पर्युषण सुरु आहे. त्यानिमित्ताने जैन बांधवांना शुभेच्छा देणारे फलक शिवसेना (ठाकरे) पक्षाने लावले आहेत.
या फलकावर स्थानिक खासदार अनिल देसाई आणि आमदार महेश सावंत याची छायाचित्रे आहेत. ज्येष्ठ शिवसैनिक आणि आजी माजी सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी यांच्यावतीने या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. आत्मशुद्धी एवं अहिंसा के महापर्व पर्युषणनिमित्त हार्दिक शुभेच्छा असे या फलकावर म्हटले आहे.
दरम्यान, दादर हा परिसर मराठी माणसांचा परिसर म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे वर्षानुवर्षे शिवसेनेचा बालेकिल्ला अशी या परिसराची ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षात दादरमध्ये अमराठी लोकांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यातही गुजराती, मारवाडी, जैन, तमीळ, तेलगु समुदायाची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे केवळ मराठी मतदारांची बाजू घेऊन शिवसेनेला किंवा मराठीचा पुरस्कार करणाऱ्या कोणत्याही पक्षाला परवडणारे नाही. त्यामुळे महापालिका निवडणूकीच्या तोंडावर जैन समुदायाला खुष करण्यासाठी हे फलक लावले असल्याची या विभागात चर्चा आहे.
काय आहे पर्युषण पर्व?
पर्युषण पर्व हा जैन धर्मातील वार्षिक व पवित्र उत्सव मानला जातो. आत्म्याची शुद्धता आणि संयमाचे प्रतीक असलेला हा उत्सव ओळखला जातो. हा उत्सव आठ दिवस साजरा केला जातो. या काळात जैन समाज उपवास, ध्यान आणि स्वाध्यायाच्या माध्यमातून आत्मचिंतन करतात. भाद्रपद महिन्यात साजरा होणारा हा उत्सव संवत्सरी या सार्वत्रिक क्षमायाचनेच्या दिवशी संपन्न होतो. या दिवशी जैन समाजातील लोक सर्व सजीव प्राण्यांची क्षमा मागतात. “मिच्छामी दुक्कडम्” हा जैन धर्माशी संबंधित वाक्प्रचार या दिवशी उच्चारला जातो, ज्याचा अर्थ “माझी सर्व अनुचित कृती निष्फळ होवोत” किंवा “मी सर्व सजीव प्राण्यांची कळत-नकळत झालेल्या चुकीसाठी क्षमा मागतो” असा होतो.