दाऊदी बोहरा समाजाचे ५२ वे धर्मगुरू डॉ. सय्यदना मोहंमद बुऱ्हानुद्दीन यांचे शुक्रवारी मुंबईत निवासस्थानी  हृदयविकाराच्या धक्क्याने झाले. ते ९९ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात सात पुत्र आणि तीन मुली असा परिवार आहे. दाऊदी बोहरा समाजातील महिला आणि पुरुषांमध्ये शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी केलेले कार्य महत्वाचे आहे.
६ मार्च १९९५ रोजी सुरत येथे जन्मलेल्या बुऱ्हानुद्दीन यांची १९६५ मध्ये दाऊदी बोहरा समाजाचे ५२ वे धर्मगुरू म्हणून नेमणूक करण्यात आली. वयाच्या १५ व्या वर्षी त्यांनी हाज यात्रा केली होती. इस्लामिक कालगणनेनुसार २५ मार्च २०११ रोजी त्यांनी शंभरीत पदार्पण केले होते. त्या निमित्ताने तेव्हा मुंबईत मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईसह देश आणि विदेशातून त्यांचे असंख्य चाहते या वेळी उपस्थित होते. दाऊदी बोहरा समाजात शिक्षणाचे महत्व त्यांनी रुजविले. सामाजिक सुधारणांवरही त्यांचा भर होता.
जागतिक पातळीवर विविध ठिकाणी दाऊदी बोहरा समाजाची प्रार्थना स्थळे, सांस्कृतिक केंद्रे उभारण्याच्या कामात त्यांचा पुढाकार होता. उत्तर अमेरिका, युरोप, आफ्रिका, ऑष्ट्रेलिया आणि अन्य ठिकाणी ही प्रार्थनास्थळे आहेत.
दाऊदी बोहरा समाजातील लोकांच्या प्रबोधनासाठी गेली अनेक वर्षे त्यांनी सलग नऊ दिवसांची व्याख्याने देशासह परदेशातही विविध ठिकाणी दिली. मुंबई, सुरत यासह दुबई, कराची, ह्युष्टन, कोलंबो आदी ठिकाणांचा यात समावेश आहे. समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शैक्षणिक न्यासाची स्थापना केली होती. या न्यासातर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ जॉर्डन, अलिगढ मुस्लिम विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी, डॉक्टर ऑफ इस्लामिक सायन्स, टेक्सास विद्यापीठ, कराची विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी असे सन्मान त्यांना मिळाले होते. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे कुलुगुरूपद त्यांनी भुषविले होते. लंडन येथील रॉयल आल्बर्ट हॉलमध्ये व्याख्यान देण्याचा मानही त्यांना मिळाला होता.