मुंबई : मुंबई ते पुणे दरम्यान धावणारी वेगवान अशी डेक्कन क्वीन आजपासून (बुधवार, २२ जून)नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत येत आहे. वजनाने हलके आणि अपघातरहित एलएचबी डबे आणि वेगळी रंगसंगती डेक्कन क्वीनला देण्यात आली आहे. सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी नवी गाडी सीएसएमटी येथून पुण्यासाठी निघणार आहे.

मुंबई ते पुणे दरम्यान मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग प्रवास करतो. त्यांची डेक्कन क्वीनलाच अधिक पसंती असते. ही गाडी १ जुन १९३० रोजी पहिल्यांदा धावली. त्यापूर्वी ही गाडी कल्याण ते पुणे धावत होती. त्यानंतर सीएसएमटीपर्यंत धावायला लागली. यात महिलांसाठी राखीव डबे, पासधारकांसाठी डबे, जनरल डबे, वातानुकूलित डब्यांबरोबरच डायनिंग कारही आहे. अशा डेक्कन क्वीनला नव्या रुपात आणण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डेक्कन क्वीनला वेगळी रंगसंगती देण्यात आली असून त्यातील आसनव्यवस्थेतही बदल केले आहेत. अंतर्गंत सजावटीतही बदल करण्यात आले आहेत. नव्या डेक्कन क्वीनचे डबे हे एलएचबी असून वजनाने हलके पण मजबूत आहेत. जुन्या डब्यांच्या तुलनेत या डब्यात अधिक जागा असून प्रवाशांना सहजपणे वावरता येईल. याशिवाय डायनिंग (उपहारगृह डबा) कारमध्ये बदल करण्यात आले असून तो डबा रुंद आहे आणि त्यात अग्निशमन यंत्रणाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या डब्यात एकाच वेळी ४० प्रवासी बसून खानपान सेवेचा आस्वाद घेऊ शकतील.