मुंबई : मागील तीन वर्षांत राज्यातील मान्यता मिळालेल्या १५० महाविद्यालयांनी भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेचे (पीसीआय) निकष पायदळी तुडविल्याचे उघडकीस आले आहे. या १५० संस्थांमध्ये १२८ संस्था पदविका म्हणजेच डी.फार्म अभ्यासक्रमाच्या, तर २२ संस्था बी. फार्म म्हणजे पदवी अभ्यासक्रमाच्या आहेत. या संस्थांची पहिल्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून, या महाविद्यालयांना पुढील सात दिवसांत कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात येणार आहे.

करोना काळात राज्यातील फार्मसी संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली होती. त्यामुळे अनेक नव्या संस्थांनी मान्यतेसाठी पीसीआयकडे अर्ज पाठवले होते. गेल्या तीन वर्षांत पीसीआयने पदविका अभ्यासक्रमाच्या २२० आणि पदवीच्या ९२ नव्या महाविद्यालयांना परवानगी दिली. मात्र या महाविद्यालयांमध्ये आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याचे उघडकीस आल्याने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने तंत्रशिक्षण संचालनालय आणि तंत्रशिक्षण मंडळ यांच्यातर्फे या संस्थांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता.

या पाहणीत पदविका अभ्यासक्रमाच्या २२० पैकी १२८ म्हणजे जवळपास ६० टक्के संस्था पात्रतेचे निकषच पूर्ण करत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. यात अग्निसुरक्षा प्रमाणपत्रच न घेणे, भोगवटा प्रमाणपत्र नसणे, प्रयोगशाळांची संख्या कमी असणे, पीसीआयच्या निकषांपेक्षा कमी कर्मचारी संख्या असणे अशा अनेक गोष्टी आढळून आल्या. विशेष म्हणजे अग्निसुरक्षा प्रमाणपत्र नसलेल्या संस्थांची संख्या ७५ एवढी प्रचंड आहे.

पदवी अभ्यासक्रमाच्या ९२ नव्या संस्थांपैकी २२ संस्थांनी पीसीआयचे निकष पूर्ण केलेले नाहीत. यात मुंबई विभागामधील गेल्या तीन वर्षांतील १४ नव्या संस्थांपैकी ९ संस्थांच्या निकषांत गडबड आहे. पुणे आणि अमरावती विभागातील एकाही संस्थेच्या पाहणीत दोष आढळलेले नाहीत. आता तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सर्व संस्थांना भेट देऊन सखोल पाहणी करतील, असेही एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

‘कारणे दाखवा’ नोटीस बजावणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सर्व १५० संस्थांमधील पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया तातडीने थांबवण्यात येणार आहे. त्याशिवाय येत्या सात दिवसांत सर्व संस्थांना ‘कारणे दाखवा नोटीस’ पाठवण्यात येईल. ही नोटीस संचालनालयाच्या संकेतस्थळावर आणि संबंधित संस्थेच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध केली जाईल. या संस्थांना निकषांची पूर्तता करण्यासाठी ३० दिवसांचा अवधी दिला जाईल. त्यादरम्यान पूर्तता झाली नाही, तर संबंधित विद्यापीठांना संस्थांबरोबर असलेली संलग्नता रद्द करण्याबाबत पत्र पाठविण्यात येणार आहे. तसेच या संस्थांची मान्यता रद्द करण्याची विनंती करणारे पत्र पीसीआयला पाठवण्यात येणार आहे.