मुंबई : दाऊद टोळीशी संबंध असल्याचा संशय असलेला आरोपी सरवर खानला शस्त्र पुरवणाऱ्याला गुजरातमधून अटक करण्यात आली. दीपक नंदकिशोर शर्मा (३२) असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीविरोधात यापूर्वीही नऊ गुन्हे दाखल आहेत.गुन्हे शाखेच्या तपासानुसार, आरोपी शर्मा याची ठाणे कारागृहात सरवर खानसोबत ओळख झाली होती. सरवर खानने अपहरण करण्यासाठी वापरलेले पिस्तुल शर्माने दिल्याचा आरोप आहे.

गुन्ह्यात आधीच अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलिसांनी शर्माला गुजरातमधून शोधून काढले आणि त्याला मुंबईत आणण्यात आले आहे. अमली पदार्थ तस्करीचा गुन्हा असलेल्या साजिद इलेक्ट्रिकवाला आणि त्याचा साथीदार शब्बीर सिद्दीकी यांचे मुंबईतून अपहरण करण्यात आले होते.

सरवर खानने खंडणीची मागणी करताना इलेक्ट्रीकवाला यांच्या कपाळावर पिस्तूल ठेवले होते. ती पिस्तूल शर्मा याच्याकडे सापडली असून त्याच्याकडून पाच जिवंत काडतूसांसह ती जप्त करण्यात आली आहे. शर्माला यापूर्वी २०२१ मध्ये दहिसरमधील गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आली होती. तो ठाणे कारागृहात सुमारे सात महिने होता. त्याचदरम्यान त्याची सरवर खानसोबत ओळख झाली होती. शर्मा हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबई, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत.

काय आहे प्रकरण

इलेक्ट्रिकवाला व त्याचा साथीदार शब्बीर यांना मुंबईत जबरदस्तीने मोटरगाडीत बसवून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी त्यांना रायगड जिल्ह्यातील नेरळ आणि त्यानंतर नाशिक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली येथे ठेवले होते. आरोपींचा म्होरक्या सरवर खान याने या वर्षाच्या सुरूवातीला अपहरण केलेल्या साजिद इलेक्ट्रिकवालाला ५० लाख रुपये दिले होते. इलेक्ट्रिकवाला मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ कसा बनवायचा याची माहिती असल्यामुळे त्याने त्याला ती रक्कम दिली होती.

पण इलेक्ट्रिकवालाने पैसे परत केले नाहीत. शिवाय त्याला माहितीही दिली नाही. अखेर खानच्या सांगण्यावरून इलेक्ट्रिकवालाचे अपहरण करून त्याला मारहाण केली. तसेच इलेक्ट्रिकवाल्याच्या पत्नीला दूरध्वनी करून तिच्याकडे ५० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. ५० लाख रुपये मिळाल्यानंतर त्यांनी त्याच्याकडून आणखी रक्कम मिळविण्याचा कट रचला व सुटकेसाठी आणखी तीन कोटी रुपयांची मागणी केली. त्याला विविध ठिकाणी डांबून ठेवण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इलेक्ट्रिकवालाचे कुटुंबिय गुजरातमधील सूरतमध्ये राहात असल्यामुळे त्यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. मात्र, जुलै महिन्यातही साजिदची सुटका न झाल्याने सिद्दीकीने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि १० जुलैला गुन्हा दाखल केला. ते प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या सहा पथकांनी आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेऊन मंगळवारी उत्तर प्रदेशातील बांदा येथे छापा टाकून साजिद इलेक्ट्रिकवालाची सुटका केली.