मुंबई : वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील पात्र झोपडीधारकांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत पुनर्विकासात सामावून घेण्यात येणार आहे. तिन्ही ठिकाणच्या पात्र झोपडीधारकांना एकत्रितपणे वरळीमध्ये घरे देण्यात येणार आहेत. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाला झोपडीधारकांनी विरोध केला असून वरळीत नव्हे तर मुळ ठिकाणी कायमस्वरूपी घरे देण्याची मागणी झोपडीधारकांकडून करण्यात आली आहे.

हेही वाचा: मुंबई: बीडीडीतील पात्र झोपडीधारकांना आता ३०० चौ. फुटांची घरे; सरकारकडून शासन निर्णय जाहीर

बीडीडी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत मूळ भाडेकरूंसह पोलीस, झोपडीधारक आणि दुकानदारांनाही पुनर्विकासात सामावून घेण्यात येणार आहे. पुनर्विकास आराखड्यानुसार ना. म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळी येथील पात्र झोपडीधारकांना एकत्रित वरळीमध्ये घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या झोपडीधारकांना नियमानुसार २६९ चौरस फुटाचे घर देण्यात येणार होते. त्याला विरोध करीत झोपडीधारकांनी ३१५ चौरस फुटाच्या घराची मागणी होती. ही मागणी अखेर सरकारने मान्य केली. आता २६९ चौरस फुटांऐवजी ३०० चौरस फुटांचे घर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंबंधीचा शासन निर्णय जाहीर झाला आहे.

हेही वाचा: ना. म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास : स्थलांतरित रहिवासी आंदोलनाच्या पावित्र्यात; रहिवाशांवर आंदोलन करण्याची वेळ का आली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोठ्या घराची मागणी मान्य झाल्यानंतर आता झोपडीधारकांनी वरळीत नव्हे तर मुळ ठिकाणी घरे देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे नायगावमधील आणि ना. म. जोशी मार्ग येथील मुळ ठिकाणीच झोपडीधारकांना घरे द्यावीत अशी मागणी करण्यात आल्याची माहिती झोपडीधारक/रहिवासी रमेश नाडकर यांनी दिली. लवकरच गृहनिर्माण मंत्र्यांकडे ही मागणी करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.