मुंबई : म्हाडाकडून गृहप्रकल्पासाठी विकासकांवर अधिमूल्य आकारले जाते. अधिमूल्याची रक्कम भरण्यास विलंब झाल्यास विकासकांवर १८ टक्के व्याज आकारले जाते. हे व्याजदर अधिक असून हे दर कमी करण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. तर हे दर कमी करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे (नरेडको) वांदे – कुर्ला संकुल येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे तीन दिवसीय मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘होमेथॉन २०२३’ नावाने भरविण्यात आलेल्या या मालमत्ता प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी फडणवीस यांनी प्रदर्शनस्थळाला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.
हेही वाचा >>>केईएम रुग्णालयात रक्ततपासणीसाठी गर्भवती महिला तासन तास तिष्ठत
म्हाडाकडून विकासकांवर आकारण्यात येणारे व्याज अधिक असून ते कमी करण्याची मागणी ‘नरेडको’ महाराष्ट्रचे अध्यक्ष संदीप रूनवाल यांनी केली. म्हाडा आकारत असलेले व्याजदर अधिक असून ते कमी करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन फडणवीस यांनी या वेळी दिले. या बाबतचा आढावा घेऊन म्हाडाला व्याजदर कमी करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यास सांगितले जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.