मुंबई: राज्यात सर्वच महापालिकांमध्ये भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी महायुतीचे घटकपक्ष आघाडीवर आहेत, तेथे तिन्ही पक्ष स्वतंत्रच लढतील. महाविकास आघाडीची ताकद आहे तेथे महायुती म्हणून एकत्र लढू. स्वतंत्र लढलो तरी निवडणुकीनंतर महायुती पुन्हा एकत्र येईल. यातूनच मुंबई महानगर प्रदेशातील नऊपैकी केवळ चार महापालिकांमध्ये युती होईल. अन्य ठिकाणी आम्ही स्वबळावर लढणार आहोत, असा निर्णय झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन बहुतांश ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे. ज्या महापालिकेत भाजप-शिवसेना किंवा भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यातच सत्तेसाठी लढाई होणार आहे, तेथे आम्ही वेगवेगळे लढणार असून जिथे काँग्रेस किंवा महाविकास आघाडीशी सामना होणार आहे तेथे महायुती म्हणून एकत्र लढणार असल्याचे संकेत फडणवीस यांनी दिले. पुण्यात भाजप- राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षांची ताकद समान आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांची ताकद असल्याने तेथे युतीबाबतचा निर्णय पवारांवर सोपविण्यात आला आहे. नागपूरमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई महानगर प्रदेशातही भाजपाची ताकद वाढली असून हिंदी भाषक मतदारांसोबतच जैन, गुजराती मतदार भाजप सोबत आहे. जैन समाजात स्थानिक पातळीवर नवी संघटना उभारून निवडणुका लढण्याचा इशारा गंभीर नाही. लवकरच त्यांचे मत बदलेल आणि हा समाज भाजपासोबत उभा राहील, असा दावा करीत फडणवीस यांनी महानगर प्रदेशातील नऊ महापालिकांपैकी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई- विरार आणि पनवेल या महापालिकांमध्ये महायुती एकत्र लढण्याचे संकेत दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संकेत

ठाणे जिह्यातील महापालिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी अनन्यसाधारण महत्वाच्या आहेत. त्यामुळे ठाण्यात शिंदे यांच्या इच्छेनुसारच युतीचा निर्णय होईल. ठाणे महापालिकेत शिवसेना-भाजपचीच ताकद असून दोन्ही पक्षांत इच्छुकांची संख्या अधिक आहे. नवी मुंबईतही भाजपाचे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे. तर भाईंदरमध्ये भाजपचीच ताकद असून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी तडजोडीची भूमिका घेतल्यास तेथे युती होऊ शकेल. मात्र ठाणे आणि नवी मुंबईत युतीची शक्यता दुरापास्त असून तेथे शिंदे यांच्यावर निर्णय सोपविण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर होईल. निवडणुकीनंतर अन्य महापालिकामध्येही महायुतीची सत्ता असेल, असा दावा फडणवीस यांनी केला.

राज ठाकरेंचे सर्वाधिक नुकसान

शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांना एकत्र येणे अपरिहार्य होते. मराठीच्या मुद्द्यावरून ते एकत्र आले असले तरी अस्तित्वासाठी त्यांना एकत्र येणे महत्त्वाचे होते. मुंबई महापालिकेत ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे उद्धव ठाकरे यांना फायदा होणार असला तरी या निवडणुकीनंतर सर्वाधिक नुकसान राज ठाकरे यांना होईल, असा दावाही फडणवीस यांनी केला.

पुढील आठवड्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांना मदत

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांपैकी ६०-६५ टक्के शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली आहे. पुढील आठवड्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांना मदत पोहोचेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. गुजरातमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी राज्यात सध्या तरी मंत्रिमंडळात कोणतेही बदल केले जाणार नाहीत. मंत्रिमंडळाचा एक वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर मंत्र्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन करून फेरबदलाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.