मुंबई : बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहणाऱ्या दहिसर नदीत गणेश विसर्जन करण्याचा प्रयत्न काही राजकीय नेत्यांनी केला. मात्र, पर्यावरणप्रेमींनी त्याला विरोध केला. उच्च न्यायालयाने पर्यावरणाच्या रक्षणार्थ दहिसर नदीत मूर्तीचे विसर्जन करण्यास मनाई केली होती. दरम्यान, या परिसरातील अनेक नागरिकांनी गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांना पसंती दिली.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहणाऱ्या दहिसर नदीत मूर्तीचे विसर्जन करण्यास मनाई आहे. गेल्या तीन-चार वर्षांत या नदीत मूर्तीचे विसर्जन झालेले नाही. मुंबई महानगरपालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या कृत्रिम तलावात मूर्तीचे विसर्जन करण्यात येत होते. मात्र, या वर्षी उद्यानाच्या परिसरातील रस्त्यांवर विसर्जनासंदर्भात फलक लावण्यात आले होते. उद्यान प्रशासनाची परवानगी मिळाल्याचा दावाही करण्यात आला होता.
दरम्यान, अनंत चतुर्दशीच्या दिवशी उद्यान परिसरात एका ठिकाणी नदीपात्रात पाणी अडवण्यात आले होते. मात्र, पर्यावरणप्रेमींच्या विरोधामुळे उद्यानाचे प्रवेशद्वारही बंद करण्यात आले होते. परिणामी, दहिसर नदीत विसर्जन झाले नाही, अशी माहिती पर्यावरणप्रेमींकडून देण्यात आली. तसेच अनेक भाविकांनी विसर्जनासाठी कृत्रिम तलावांना पसंती दिली.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्रीपर्यंत एकाही गणेशमूर्तीचे विसर्जन झाले नाही. उद्यानाचे प्रवेशद्वार बंद होते. तसेच दोन ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला होता.
– सोमनाथ घार्गे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १२
