मुंबई : धनगर समाजाला भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणार आहे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असला तरी राज्य शासन या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

 वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मंत्री आमदार दादाजी भुसे, अब्दुल सत्तार, सुहास कांदे, माजी आमदार विजय शिवतारे, आयोजक माजी नगरसेवक योगेश जानकर आदी मान्यवर उपस्थित होते.

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सर्व सोई-सुविधा दिल्या जातील. समाजाच्या सर्वागीण विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येईल. विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातील. अहिल्याबाई होळकर यांचे भव्य स्मारक व्हावे ही माझीही इच्छा आहे. राज्यात त्यांचे भव्यदिव्य स्मारक उभारले जाईल. अहमदनगरला अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याची बाब तपासून कार्यवाही करण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेतले जातील. धनगर वाडय़ा वस्त्यांमध्ये सोयीसुविधा दिल्या जातील. तसेच आत्मदहन करणाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये देऊ व त्यांना नोकरी देण्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.