मुंबई : मोबाईल खरेदी करून त्याद्वारे कर्जाची रक्कम उपलब्ध करून देण्याच्या बहाण्याने अनेकांची फसणूक करणाऱ्या सोनू बाबा पीर मोहम्मद (३६) याला धारावी पोलिसांनी नुकतीच अटक केली. आरोपीविरोधात शीव, डोंगरी व धारावी या पोलीस ठाण्यांमध्ये १५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. मोबाईलवर कर्ज मिळवून देणाच्या बहाण्याने आरोपीने अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात तक्रारदारांंची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
मोबाईल कर्जाचा बहाणा
सोनू बाबा हा नवी मुंबईतील ऐरोळी परिसरातील रहिवासी आहे. आरोपी कमी व्याज दरात कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करायचा. ३० वर्षीय तक्रारदार महिला शीव परिसरातील रहिवासी आहेत. त्यांना ८० हजार रुपये कर्जाची आवश्यकता होती. आरोपीने त्यांच्या पतीची कागदपत्रे तपासून त्यांना दीड लाखांपर्यंत कर्ज सहज मिळेल, असे सांगितले. त्यानंतर आरोपी सोनू बाबाने त्यांना कागदपत्रांसह धारावी येथील मोबाईल दुकानात बोलावले. आपण तुमच्या पतीच्या कागदपत्रांवर मोबाईलसाठी कर्ज घेऊन तो खरेदी करू.
त्यानंतर तो मोबाईल दुसऱ्या व्यक्तीला विकून ती रक्कम तुम्हाला मिळेल, असे सांगितले. त्यानुसार आरोपीने तक्रारदार महिलेच्या पतीच्या कागदपत्रांवर कर्जाची प्रक्रिया सुरू करून आयफोन १५ खरेदी केला. त्याने तक्रारदाराला मोबाईलचा बॉक्स उघडण्यास सांगून त्याचे चित्रीकरण केले. त्यानंतर तो बॉक्स व मोबाईल घेऊन त्याने दुसऱ्या व्यक्तीला दिला. तसेच तक्रारदार महिलेला घरी जाण्यास सांगितले. मोबाईल विकून तुमचे पैसे लवकरच घरी पाठवून देतो, असे सांगितले. त्यानंतर आरोपीने मोबाईल व त्याची रक्कम काहीही न देता फसवणूक केली.
१५ हून अधिक गुन्हे
आरोपीने अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरोधात शीव, डोंगरी व धारावी पोलीस ठाण्यात १५ हून अधिक गुन्हे दाखल आहे. आरोपी गरज असलेल्या व्यक्तींना कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आमीष दाखवायचा. त्यासाठी आपण हफ्त्यावर मोबाईल खरेदी करूया. तो मी तात्काळ विकून त्याची संपूर्ण रक्कम तुम्हाला देईन. मग तुम्ही त्याचे हफ्ते भरून दोन-तीन वर्षात कर्ज फेडा असे सांगायचा. त्यानंतर मोबाईल दुसऱ्या व्यक्तीला विकून त्या रकमेचा अपहार करत होता. आरोपीने मुंबई व नवी मुंबई परिसरातही अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याचा संशय आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.