मुंबई : धारावी परिसरात झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एका महिलेच्या हाताला गोळी लागून ती गंभीर जखमी झाली. ही घटना घाटकोपर येथील ९० फूट रस्त्यावर घडली, अशी माहिती पोलिसांनी दिली. शस्त्र हाताळत असताना त्यातून गोळी सुटली असल्याचा प्राथमिक संशय आहे. पण आम्ही सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या मदतीने पोलीस तपास करत आहेत. अद्याप गोळी झाडणाऱ्या व्यक्तीची ओळख व घटनाक्रमानुसार अधिक माहिती अजूनही मिळालेली नाही, असे पोलिसांनी सांगितले.
३२ वर्षीय महिला रस्त्याच्या कडेला खरेदीसाठी उभी असताना तिच्या हातावर गोळी लागली. तक्रारदार महिला मूळची बिहार येथील रहिवासी असून तिचा पती फळ विक्रेता आहे. ती धारावी परिसरात पती व मुलांसह राहते. या गोळीबारात तिच्या हाताला गंभीर जखम झाली आहे. याप्रकरणी शाहू नगर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १०९ (खुनाचा प्रयत्न) आणि भारतीय हत्यार बंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महिला मूळची बिहारमधील रहिवासी आहे. तिचे तेथे कोणाशी वाद नाही. त्यामुळे शस्त्र हाताळत असताना चुकून तिला गोळी लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पण आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत. महिलेच्या कुटुंबियांकडूनही माहिती घेण्यात आली असून त्यांनाही कोणाविरोधात संशय नाही. परिसरातील सर्व सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली असून त्यात कोणतीही ठोस माहिती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. महिलेवर उपचार करण्यात आले असून तिची प्रकृती स्थीर आहे. रविवारी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तपासासाठी अनेक पथके तयार करण्यात आली आहे. न्यायावैद्यक तज्ज्ञांच्या मदतीने शाहू नगर पोलीस अधिक तपास करत आहे.