मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अंधेरी पश्चिम – मंडाले मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डन – मंडाले या पहिल्या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसातच या टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात ही मार्गिका सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

एमएमआरडीए २२ किमी लांबीच्या आणि २२ स्थानकांचा समावेश असलेल्या मेट्रो २ ब मार्गिकेचे काम दोन टप्प्यात करीत आहे. मंडाले – डायमंड गार्डन आणि डायमंड गार्डन – मंडाले असे हे दोन टप्पे आहेत. यापैकी मंडाले – डायमंड गार्डन टप्प्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून या टप्प्याच्या संचलनासाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) दिल्ली यांच्या पथकाकडून काही दिवसांपासून चाचण्या करण्यात येत होत्या. या चाचण्या पूर्ण झाल्या असून आता मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा पाहणी करतील आणि त्यानंतर या टप्प्याला सुरक्षा प्रमाणपत्र मिळेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

त्यामुळे येत्या काही दिवसातच डायमंड गार्डन – मंडाले टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यास या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा होणार आहे. या टप्प्याचे संचलन सुरू झाल्यास मुंबईतील वाहतूक सेवेत दाखल होणारी ही पाचवी मार्गिका ठरणार आहे.

कुलाबा – वांद्रे – सीप्झ – आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील शेवटच्या आचार्य अत्रे चौक – कफ परेड टप्प्याचे लोकार्पण ३० सप्टेंबर रोजी होणार असल्याची चर्चा होती. मात्र आता हा मुहूर्त पुढे गेला असून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. तर मेट्रो २ ब मार्गिकेतील पहिल्या टप्प्याचेही यावेळीच लोकार्पण होईल अशी चर्चा आहे. मात्र याबाबत एमएमआरडीएकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नाही. तर मेट्रो ३ च्या शेवटच्या टप्प्याबरोबरच मेट्रो २ ब च्या पहिल्या टप्प्याचेही लोकार्पण करण्यासंबंधीही एमएमआरडीएकडून अद्याप कोणतीही निश्चिती झालेली नाही. मात्र सुरक्षा प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने आता हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये हा टप्पा वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता दाट झाली आहे.