मुंबई : शांततेचं प्रतीक समजल जाणारी कबुतरे आज शहरी आरोग्याला गंभीर संकट ठरू लागली आहेत . मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, नागपूर यांसारख्या प्रमुख शहरी भागात कबुतरांची वाढती गर्दी ही केवळ सौंदर्याचा आणि स्वच्छतेचा प्रश्न न राहता थेट श्वसनसंस्थेशी संबंधित गंभीर आजारांचे मूळ कारण बनत आहे. विशेषतः बहुमजली इमारतींमध्ये गॅलऱ्या, टेरेस आणि पाईपलाईन यांसारख्या ठिकाणी कबुतरांनी केलेली घरटी आणि साचलेली विष्ठा यामुळे ‘हायपरसिटीव्हिटी न्यूमोनायटिस’, ‘क्रिप्टोकॉक्कोसिस’ ‘बर्ड फॅन्सियर्स लंग’ अशा अनेक दुर्मिळ पण जीवघेण्या फुफ्फुसाच्या आजारांमध्ये वाढ होत असल्याचे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले आहे.
कबुतरांना खाणे घालण्याच्या मुद्द्यावरून मुंबईत वातावरण तापत चालले आहे. याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात पोलिसांनी गुन्हाही दाखल केला असून दादर येथील कबुतरखाना बंद करण्यावरून काहीजण आंदोलन करत आहेत. मात्र याच कबुतरांच्या विष्ठेमुळे जीवघेणे श्वसन विकार निर्माण होत असून कबुतरांना खाणे देणारे याची जाणीव बाळगायाला तयार नाहीत. एकीकडे श्वसनविकाराने डॉक्टरांकडे जाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे तर दुसरीकडे कबुतरांना खाणे देण्यावरून सुरु असलेले आंदोलन वाढताना दिसत आहे.
मुंबईकर गंभीर श्वसनविकारांनी त्रस्त
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) २०२४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या ‘ अर्बन रेस्पिरेटरी हेल्थ इंपॅक्ट’ अहवालात दिलेल्या माहितीनुसार, केवळ महाराष्ट्रातील शहरी भागांमध्ये दरवर्षी सुमारे ६,५०० नवीन रुग्णांमध्ये कबुतरांमुळे होणाऱ्या ‘बर्ड फॅन्सियर्स लंग’ किंवा एचपी या आजाराची नोंद झाली आहे. मुंबईतील केईएम, सायन, नायर, तसेच पुण्याच्या ससून आणि जेजे रुग्णालयात वर्षाकाठी सुमारे ४००–५०० अशा गंभीर श्वसनविकारांनी ग्रस्त रुग्णांना उपचारासाठी दाखल केलं जात असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली आहे. या रुग्णांमध्ये लक्षणे दिसण्याचे प्रमुख कारण म्हणजे कबुतरांच्या विष्ठेतील बुरशीजन्य घटक आणि पिसांतील प्रथिन, जी हवा प्रदूषित करतात आणि थेट फुफ्फुसात जातात.
कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसविकाराचा त्रास
या आजारांमध्ये ‘क्रिप्टोकॉक्कोसिस’ विशेषतः जीवघेणा ठरू शकतो. हा आजार क्रिप्टोकॉक्कोसिस निओफॉर्मन्स नावाच्या बुरशीमुळे होतो, जी प्रामुख्याने कबुतरांच्या विष्ठेत आढळते. क्रिप्टोकॉक्कोसिसमुळे सुरुवातीला श्वसनाचे त्रास निर्माण होतात आणि कालांतराने मेंदूवरील दुष्परिणाम आणि न्यूरोलॉजिकल विकृती देखील आढळतात. देशातील २०२३ च्या राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार, देशभरात अशा बुरशीजन्य संसर्गाच्या १७,००० प्रकरणांमध्ये सुमारे ४० टक्के प्रकरणांमध्ये कबुतरांचा संबंध आढळून आला आहे.
मुंबई महापालिकेच्या प्राणिसंवर्धन विभागाच्या २०२३ च्या वार्षिक अहवालानुसार, मुंबई शहरातच सुमारे पाच लाखांहून अधिक कबुतरं सार्वजनिक आणि खाजगी इमारतींवर वास्तव्यास आहेत. विशेषतः गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, दादर चौपाटी, सीएसटी परिसरातील ओपन स्पेसमध्ये नागरिकांकडून कबुतरांना खाण्यासाठी दाणे टाकले जातात, ज्यामुळे त्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होते. हे दृष्य एखाद्या छायाचित्रासाठी मोहक वाटू शकते, पण यामागे लपलेलं गंभीर आरोग्य संकट फारच धोकादायक ठरत आहे.
सरकारच्या कारवाईचे ठाम समर्थन
लीलावती रुग्णालयातील ज्येष्ठ छाती विकारतज्ज्ञ डॉ. जलील परकार सांगतात की, “कबुतरांची विष्ठा कोरडी झाल्यानंतर त्यातून निर्माण होणारे सूक्ष्म बुरशीजन्य कण हवेत मिसळतात. हे कण दीर्घकाळ श्वसनातून शरीरात गेल्यास फुफ्फुसांमध्ये क्रॉनिक इन्फ्लेमेशन होतो. अनेक वेळा यामध्ये तीव्र स्वरूपाचे न्यूमोनायटिस निर्माण होते आणि योग्य उपचार न झाल्यास फुफ्फुसाचे कार्य कमी होते. गेल्या काही वर्षांमध्ये कबुतरांशी संबंधित आजारांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून सरकारने कबुतरांना खाणे घालण्यावर घातलेल्या बंदीचे मी ठाम समर्थन करतो असेही डॉ जलील परकार यांनी सांगितले. दादर व घाटकोपर येथे कबुतरांना खाणे घालण्याच्या परिसरातून मोठ्या संख्येने खोकला व श्वसनाच्या त्रासाचे रुग्ण माझ्याकडे उपचारासाठी येत असतात. माणसाचा जीव महत्त्वाचा की कबुतराचे खाणे हे आता ठरवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.विशेष म्हणजे या आजारांचा धोका केवळ वयस्कर व्यक्ती, लहान मुले किंवा अँलर्जीक रुग्णांपुरताच मर्यादित नाही. प्रतिकारशक्ती कमी असलेले व्यक्ती, मधुमेह, कर्करोग रुग्ण, एएचआयवाही- एडस््चे रुग्ण किंवा दिर्घकालीन स्टेरॉइड वापरणारे रुग्ण हे ‘हाय रिस्क ग्रुप’मध्ये मोडतात. त्यांच्यासाठी ही बुरशीजन्य संसर्ग अधिक घातक ठरतो असेही डॉ परकार म्हणाले.
या परिस्थितीवर उपाययोजना म्हणून अनेक महापालिकांनी काही पावलं उचलली आहेत. मुंबई महापालिकेने इमारतींना कबुतरांची घरटी टाळण्यासाठी जाळ्या आणि कबुतरांना अन्न न देण्याबाबत जागरूकता मोहीम राबवायला सुरुवात केली आहे. पुणे महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना अन्न टाकणं रोखण्यासाठी खास फीडिंग झोन तयार करून इतर ठिकाणी दंडात्मक कारवाई केली आहे. मात्र ही मोहीम अजूनही अपुरीच ठरते आहे.आरोग्य मंत्रालयाने २०२५ च्या सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये कबुतरांशी संबंधित आजारांबाबतच्या जनजागृतीसाठी स्वतंत्र मोहिमेची शिफारस केली आहे. यामध्ये शाळा, सोसायट्या, सार्वजनिक संस्था आणि नगरपालिकांमध्ये जागरूकता व्याख्यानं, पोस्टर्स, आणि प्रतिबंधात्मक उपायांचा प्रसार यांचा समावेश आहे.
टॉवरमधील लोकही धोक्यात
डॉक्टरांनी सुचवलेला सल्ला म्हणजे नागरिकांनी आपल्या घरात आणि गॅलऱ्यांमध्ये कबुतरांना अन्न देणं टाळावं, घरांच्या खिडक्यांना आणि टेरेसना जाळ्या बसवाव्यात आणि कबुतरांची घरटी आढळल्यास त्वरित ती हटवावीत.
कबुतरांच्या वाढत्या लोकसंख्येचा परिणाम केवळ सार्वजनिक स्वच्छतेवरच नव्हे, तर थेट नागरिकांच्या श्वसन स्वास्थ्यावर होत असल्याने ही बाब केवळ पर्यावरणीय समस्या न राहता सार्वजनिक आरोग्यविषयक संकट बनली आहे. विशेषतः गगनचुंबी इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी स्वतःहून ही बाब गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. कबुतरांना दूर ठेवणं म्हणजे त्यांच्या अस्तित्वाला धोका नाही, तर माणसाच्या आरोग्याला संरक्षण देणं होय.