दिशा सतीश सालियन मृत्यू प्रकरणात वादग्रस्त विधान केल्यामुळे दाखल झालेल्या गुन्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांना दिंडोशी न्यायालयाने दिलासा दिलाय. या प्रकरणामध्ये राणे पिता-पुत्राला अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. १० मार्चपर्यंत या दोघांना अटक करता येणार नाही असा दिलासा न्यायालयाने दिलाय. दिशाच्या आत्महत्येनंतर राणे पिता-पुत्राकडून दिशाच्या आत्महत्येबाबत प्रश्नचिन्हे उपस्थित करून तिच्याविषयी अनेकदा आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले होते. दिशाची आई वासंती सतीश सालियन यांनी मालवणी पोलिसात राणे पिता-पुत्राविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 

राणेंविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक महेंद्र सूर्यवंशी हे करीत आहेत. काही दिवसांपूर्वीच गुन्ह्याच्या चौकशीसह जबाब नोंदविण्यासाठी नितेश राणे आणि नारायण राणे यांना नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसीविरोधात राणेंनी दिंडोशी न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने या दोघांना १० मार्चपर्यंत दिलासा दिलाय.

१९ फेब्रुवारीला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशाबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. तसेच नितेश यांनीही अशाच पद्धतीची वक्तव्ये केली होती. याच प्रकरणात आता या दोघांची शनिवारी ५ मार्चला मालवणी पोलीस ठाण्यात चौकशी होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगळवारी (१ मार्च, २०२२ रोजी) राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित आयटी परिषद पार पडली. त्यानंतर बोलतानाही राणे यांनी दिशा सालियान प्रकरणावरुन शिवसेना नेत्यांवर टीका केली. दिशा सालियान प्रकरणात सत्य समोर आल्यास शिवसेनेचा मोठा नेता कारागृहात जाईल. त्यामुळे प्रकरण फिरवण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. दिशाला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून तिच्या कुटुंबीयांनी आमचे आभार मानायला हवेत, असेही ते म्हणाले.