सार्वजनिक गणेशोत्सवात मंडपाचे स्थान महत्त्वाचे असते. दरवर्षी मुंबईत अनेक ठिकाणी किमान एक महिना अगोदर मंडप उभारले जातात. या मंडपामध्येच उंच गणेशमूर्ती साकारण्याचे काम मूर्तिकार सुरू करतात. गणेशमूर्ती साकारतानाच सोबत सजावटीचेही काम सुरू होते. मात्र गणेशोत्सवानिमित्त उभारण्यात येणारे मंडप हा यंदा कळीचा मुद्दा बनला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रावणसरींची रिमझिम सुरू झाली की गणेश कार्यशाळांमध्ये मूर्तिकार, कारागिरांची लगबग, तर सार्वजनिक गणेशोत्सव साजऱ्या करणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होते. एरवी संध्याकाळी किंवा रात्री उशिरा गप्पाटप्पा, संगणक, भ्रमणध्वनीमध्ये व्यग्र असणारी तरुणाई गणेशोत्सवाच्या तयारीला लागते. सजावट काय करायची, कोणते कार्यक्रम आयोजित करायचे, त्यासाठी किती आकाराचे व्यासपीठ लागेल, गणेशमूर्ती सुरक्षित राहावी यासाठी कोणती काळजी घ्यायची आदींची आखणी करायला मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातही केली. या सार्वजनिक गणेशोत्सवात मंडपाचे स्थान महत्त्वाचे असते. दरवर्षी मुंबईत अनेक ठिकाणी किमान एक महिना अगोदर मंडप उभारले जातात. या मंडपामध्येच उंच गणेशमूर्ती साकारण्याचे काम मूर्तिकार सुरू करतात.

गणेशमूर्ती साकारतानाच सोबत सजावटीचेही काम सुरू होते. मात्र गणेशोत्सवानिमित्त उभारण्यात येणारे मंडप हा यंदा कळीचा मुद्दा बनला आहे.

मुंबईत सुमारे १२ हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून चाळी, गृहनिर्माण संकुले, खासगी वाडय़ा अथवा रस्त्यांवर या मंडळांतर्फे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. काही सार्वजनिक उत्सव मंडळे रस्त्यांवरच मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करतात. रस्त्यांवर सार्वजनिक गणेशोत्सव साजऱ्या करणाऱ्या मंडळांची संख्या सुमारे २२००च्या घरात आहे. रस्त्यांवर अवाढव्य मंडप उभारून पादचारी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या मंडळांमुळेच आजघडीला मोठा पेच निर्माण झाला आहे. वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा ठरणाऱ्या मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देऊ नये, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र तरीही गेल्या वर्षी लोकभावना लक्षात घेऊन पालिका, वाहतूक पोलीस आणि पोलिसांनी थोडा कानाडोळा केला आणि पूर्वीप्रमाणेच रस्त्यावर भव्य मंडप उभारून गणेशोत्सव साजरा झाला. या प्रकाराची न्यायालयाने गंभीर दखल घेत वाहतूक आणि पादचाऱ्यांना अडथळा ठरणारे मंडप दृष्टीस पडल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा गर्भीत इशारा दिल्यामुळे पालिका, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस ठाण्यांतील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या न्यायालयाच्या आदेशामुळे पालिकेने यंदा मंडप उभारणीच्या परवानगीबाबत अधिक दक्षता घेतली आहे. मंडप परवानगीची प्रक्रिया यंदा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेतला. मंडळांना ऑनलाइन पद्धतीने मंडप परवानगीसाठी अर्ज करण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले. पण ऑनलाइन अर्ज करता येत नसल्याचे तुणतुणे अनेक कार्यकर्त्यांनी वाजवायला सुरुवात केली. मंडप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यात अडचणी येत असल्यामुळे पालिका प्रशासनाने आपल्या विभाग कार्यालयांमध्ये मंडळांच्या मार्गदर्शनासाठी अधिकारी सज्ज ठेवले. मात्र सुरुवातीला हे अधिकारीच टाळाटाळ करत असल्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. तथापि आपले काम चोख बजावले नाही, तर कारवाई होऊ शकते याची कल्पना आल्यामुळे अधिकारीही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य करू लागले.

गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडप परवानगीसाठी स्थानिक पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस आणि महत्त्वाचे म्हणजे अग्निशमन दलाच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राची आवश्यकता असते. पूर्वी अग्निशमन दलाकडे अर्ज केल्यानंतर आवश्यक त्या पडताळणीअंती अग्निप्रतिबंधात्मक दृष्टीने ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळत होते. परंतु यंदा अग्निशमन दलाच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्रासाठी अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. या अटी वाचून अनेक मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे धाबेच दणाणले आहे. अग्निप्रतिबंधात्मक उपायांची जंत्रीच ‘ना हरकत’ प्रमाणपत्रासाठी सक्तीची करण्यात आली आहे. मंडप आणि तेथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी या अटींची पूर्तता होणे अत्यावश्यक आहे. मात्र काही अटींची पूर्तता करणे अवघड असल्यामुळे काही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी अद्याप पालिकेकडे मंडप उभारणीसाठी अर्जच केलेले नाही. अशा मंडळांची संख्या मोठी आहे. मुंबईमध्ये विनापरवाना एकही मंडप उभारला जाऊ नये याची काळजी घेण्याचे आदेश दस्तुरखुद्द पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहेत. अटी-शर्तीना घाबरून अनेक मंडळे मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्जच करायला तयार नाहीत हा एक भाग. तर साधारण एक हजारच्या आसपास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पालिकादरबारी मंडप परवानगीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. पालिका, वाहतूक पोलीस स्थानिक पोलीस ठाणे आणि अग्निशमन दलाच्या अटी-शर्तीची पूर्तता करणाऱ्या सुमारे दोनशे- सव्वादोनशे मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी मिळाली आहे. तर काही मंडळांचे अर्ज स्थानिक पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या ‘ना हरकत’ प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत आहेत.

गणेशोत्सव आता अवघ्या २३ दिवसांवर आला असून रस्त्यांवर सार्वजनिक गणेशोत्सव साजऱ्या करणाऱ्या बहुसंख्य मंडळांना अद्याप मंडप उभारण्यासाठी परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे आता हळूहळू या प्रश्नाला भावनिक रंग चढू लागला आहे. ब्रिटिश सरकारच्या विरोधात समाज एकत्र यावा, मोठी ताकद उभी राहावी या उद्देशाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. स्वातंत्र्योत्तर काळात बेतालपणे वागणाऱ्या काही जणांमुळे गणेशोत्सवाला ओंगळवाणे रूप आले. शिस्तबद्ध पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या कमी होत चालली आहे. रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करताना वाहतूक, पादचारी अथवा आसपासच्या रहिवाशांना त्रास होणार नाही याची काळजी पूर्वीपासूनच मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली असती तर आज मंडप उभारणीबाबत हस्तक्षेप घेण्याची वेळ न्यायालयावर तसेच न्यायालयाच्या आदेशांमुळे मंडपासाठी अशा कडक अटी-शर्ती घालण्याची वेळ पालिका, स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांवरही आली नसती. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. मंडळांनी आपल्या चुका सुधारून अटी-शर्तीचे पालन करून मंडप उभारणीसाठी एक पाऊल पुढे टाकावे आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांना अपेक्षित असलेला शिस्तबद्ध आणि समाजाला एकत्र आणणारा गणेशोत्सव साजरा करावा. त्यातच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि समाजाचेही हित आहे.

prasadraokar@gmail.com

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dispute pandals
First published on: 21-08-2018 at 03:20 IST