मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी रविवारी (२० जुलै) निधन झाले. गेल्या अनेक वर्षांपासून ते फुप्फुसाच्या आजाराने ग्रस्त होते. या आजारावर उपचार सुरू असताना मुंबईतील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.
चंद्रा बारोट यांनी अभिनेते मनोज कुमार यांच्यासह सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी ‘पूरब और पश्चिम’, ‘यादगार’, ‘शोर’, ‘रोटी कपडा और मकान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर चंद्रा बारोट यांनी १९७८ साली ‘डॉन’ या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आणि अमिताभ बच्चन, झीनत अमान, प्राण यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या चित्रपटाने तिकिट खिडकीवर दमदार कामगिरी केली.
‘डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है’ यांसारखे संवादही लक्षवेधी ठरले. या चित्रपटामुळे चंद्रा बारोट यांची मनोरंजनसृष्टीत विशेष ओळख निर्माण झाली. विशेष बाब म्हणजे ‘डॉन’ चित्रपटाद्वारे त्यांनी आपले जवळचे मित्र, सिनेमॅटोग्राफर व निर्माते नरीमन इराणी यांना मदत करण्याचा प्रयत्नही केला.
‘डॉन’ चित्रपटानंतर चंद्रा बारोट यांनी १९९० साली ‘अश्रिता’ आणि १९९१ साली ‘प्यार भरा दिल’ या बंगाली चित्रपटांचे दिग्दर्शन केले. याशिवाय त्यांनी ‘बॉस’ आणि ‘नील को पकडना… इम्पॉसिबल’ या चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यासही सुरुवात केली, मात्र काही कारणास्तव हे चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. गेल्या ६ ते ७ वर्षांपासून फुफ्फुसांसंबंधित काही समस्यांमुळे बारोट त्रस्त होते, या आजाराशी झुंज देताना त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून एक पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही तीव्र दुःख व्यक्त करीत माझ्या प्रिय मित्राचे निधन हा आयुष्यातील दुःखाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. तसेच हे नुकसान शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. आम्ही एकत्र काम केले होते, पण तो यापलीकडे एक कौटुंबिक मित्र होता. मी फक्त प्रार्थना करू शकतो, असे नमूद करून अमिताभ बच्चन यांनी स्वतःच्या अधिकृत ‘ब्लॉग’वर भावना व्यक्त केल्या आहेत.