मुंबई : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ तस्करी करणारा कुख्यात तस्कर सलमान सलीम शेख उर्फ शेरा बटला (३५) याला दुबईहून प्रत्यर्पण करून अटक केली. त्याच्यावर भारतात अमली पदार्थांची निर्मिती आणि विक्री केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात प्रत्यार्पण करूण आणलेला तो चौथा आरोपी आहे. शेराचा २०२२ मधील २३ कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या गुन्ह्यात सहभाग असल्याचे उघडकीस आले होते.
शेरा हा दक्षिण मुंबईचा रहिवासी असून गेल्या तीन वर्षांपासून पत्नी व कुटुंबासह दुबईत राहत होता. अंमली पदार्थविरोधी पथकाचे उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सांगितले की, स्थानिक अमली पदार्थ विक्रेत्यांच्या चौकशीत शेरा याचे नाव समोर आले. अमली पदार्थविरोधी शाखेच्या घाटकोपर कक्षाने या प्रकरणात पूर्वी चार जणांना अटक करून आरोपपत्र दाखल केले होते. त्यावेळी शेरासह तिघे फरार होते. या प्रकरणात ४ ऑगस्ट २०२२ रोजी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी नागपाडा परिसरातून मोहम्मद शाहरुख शेख (२८) याला अटक केली होती आणि त्याच्याकडून २ कोटी रुपयांचे मेफेड्रोन (एम.डी.) जप्त केले होते. शाहरुखने चौकशीत शेरा पुरवठादार असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शेराविरुद्ध रेड कॉर्नर नोटिस जारी केली होती.
शेरा परदेशात जाण्याच्या तयारीत होता. त्याच वेळी दुबई पोलिसांनी त्याला अटक केली आणि भारतीय अधिकाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली. अमली पदार्थांच्या तस्करीच्या टोळीतील शेराराची अटक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. शेराचा अमली पदार्थांच्या अन्य ५ गुन्ह्यांतही सहभाग आहे. या कारवाईमुळे राज्यातील आंतरराष्ट्रीय ड्रग्ज पुरवठा साखळी उघडकीस आली आहे. अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
