मुंबई: दादर रेल्वे स्थानकावर ३० वर्षीय मद्यधुंद तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या तरुणाने प्रथम स्वतःवर तीक्ष्ण वस्तूने वार करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर धावत्या रेल्वेगाडीखाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे पोलीस हवालदार स्वप्नील पोपरे आणि गृहरक्षक (होमगार्ड) राहुल यादव यांच्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचला. या घटनेची ध्वनिचित्रफीत समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली आहे.

घटना कशी घडली?

दादर रेल्वे पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना २६ ऑक्टोबर रोजी दुपारी १.३० च्या सुमारास फलाट क्रमांक १२ वर घडली. त्या वेळी एक तरुण नशेच्या अवस्थेत होता आणि स्वतःलाच जखमी करण्याचा प्रयत्न करत होता. तिथेच उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेतली. तरुणाने रेल्वे रुळावर उडी मारण्याचा प्रयत्न केला असता पोलीस हवालदार स्वप्नील पोपरे आणि गृहरक्षक राहुल यादव यांनी त्याला पकडून मागे ओढले आणि मोठा अनर्थ टाळला. त्या तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न का केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याला तत्काळ सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो अतिशय मद्यधुंद अवस्थेत होता आणि स्वतःचे नावसुद्धा सांगू शकत नव्हता. आम्ही त्याची ओळख पटवण्याचा आणि कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असे दादर रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

प्रवाशांमध्ये घबराट

दादर स्थानक हे मध्य आणि पश्चिम दोन्ही मार्गांवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक आहे. अशा ठिकाणी हा प्रकार घडल्याने काही काळ प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाली आहे