यंदाच्या होळीला पिचकारी म्यानच; दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याच्या बचतीसाठी उपाय; सोसायटय़ांमधील धुळवडीतून पाणी गायब पाण्यालाच तिलांजली
एकीकडे राज्यासह देशभरात दुष्काळी परिस्थिती असताना दुसऱ्या बाजूला होळीच्या सणावेळी पाण्याचा अपव्यय होऊ नये, यासाठी घराघरांतून मोठी मोहीमच उघडण्यात आली आहे. या मोहिमेचा रोख फुगे, रंगाच्या पिशव्या आणि अर्थातच पिचकाऱ्यांवर आहे. ‘आया होली का त्योहार, उडे रंग की बोछार’ असे म्हणत रंग खेळणाऱ्यांना यंदा मात्र ‘तकतक ना मार पिचकारी की धार..’ अशाच कान‘पिचकाऱ्या’ मिळत आहेत.
होळी जवळ आल्याची वर्दी सर्वात आधी दुकानांबाहेर लागलेल्या रंगीबेरंगी पिचकाऱ्याच देत असतात. पाठीवर पाण्याची टाकी बांधून हातात बंदूक घेतलेल्या पिचकाऱ्यांपासून लांब नळी मागे खेचून पाणी भरण्याच्या पिचकाऱ्यांपर्यंत विविध आकारांच्या, रंगांच्या, मापांच्या पिचकाऱ्या लहानांच्याच नाही, तर मोठय़ांच्याही पसंतीला उतरतात. होळीच्या काही दिवस आधीपासूनच आपल्या मित्रांवर पाणी उडवण्यासाठी हातातली पिचकारी घेऊन एखाद्या भिंतीच्या मागे लपून बसण्याची करामत करण्यातही मजा आहे.
त्यातच चित्रपटांमधील गाण्यांनीही या पिचकारीला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. ‘आया होली का त्योहार उडे रंग की बोछार..’ असे गात पडद्यावरचा नायक आपल्या हातातल्या पिचकारीमधील पाणी समोरच्या नायिकेवर उडवतो आणि तिला चिंब भिजवून टाकतो किंवा ‘भर पिचकारी, सखियोंनें मारी, भिगी मोरी सारी हाय हाय’ असे म्हणत सख्यांनीच भिजवल्याची लाडिक तक्रार नायिका करते. ‘होली के दिन दिल मिल जाते हैं’ असे सांगत होळी खेळणाऱ्या गावकऱ्यांच्या हातीही सिप्पींनी पिचकाऱ्याच दिल्या होत्या. होळी आणि पिचकारी यांचे अद्वैत या गाण्यांमधून अधोरेखित होते.
मात्र, यंदा हे अद्वैत भंग पावण्याची शक्यता आहे. राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती उद्भवल्याने यंदा होळी अत्यंत साधेपणाने साजरी करावी, असे आवाहन अनेक सेवाभावी संस्थांसह सरकारनेही केले आहे. त्यातच जागतिक जल दिनाचे औचित्य साधून अनेकांनी ‘पिचकारी नको’ असे संदेशही एकमेकांना दिले आहेत. त्यामुळे यंदाची होळी पिचकारीविनाच करण्याकडे अनेकांचा भर राहणार आहे.
प्रतिनिधी, मुंबई</strong>
होळी साजरी करताना किती लिटर पाण्याचा टॅंकर मागवागचा, किती किलो रंग आणायचा यावर बैठका घेणाऱ्या गृहसंकुलांमध्ये यंदा ‘पाणी वाचवा’च्या सूचना सोसायटीच्या सूचना फलकावर दिसत आहे. राज्यातील दुष्काळाच्या झळा मुंबई आणि उपनगरापर्यंत पोहोचल्या असताना मुंबईकरांनी मात्र यावर संवेदनशीलता बाळगत यावर्षीच्या होळीमध्ये पाण्याचा वापर न करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी पाण्याअभावी आत्महत्या करीत असताना आपण पाण्याचा अपव्यय करणे चुकीचे असल्याची जाणीव झाल्यामुळे गुलाल किंवा नैसर्गिक रंगाच्या साहाय्याने यंदाची होळी सुरक्षित आणि आनंददायी होळी साजरी केली जाणार आहे.
यामध्ये महिम, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी यांसारख्या अनेक सोसायटी तर चारकोप येथील सुमारे शंभर सोसायटय़ांमध्ये त्याबरोबरच मोठमोठय़ा गृहसंकुलांमध्येदेखील होळी साजरी करताना पाण्याचा वापर न करण्याचे ठरविण्यात आले आहे. यामध्ये माहिम पश्चिम येथील राजीव सोसायटीमध्ये आठवडय़ाभरापासून पाणी वाचवाची सूचना सोसायटीच्या सूचना फलकावर लावण्यात आली आहे. या उपक्रमासाठी सोसायटीतील सर्वच सदस्यानी पुढाकार घेतला असून राज्यातील पाणी टंचाईला सामोरे जाण्यासाठी सर्व नागरिकांनी एकजुटीने येण्याची गरज असल्याचे या सोसायटीचे सचिव सुमीत मसूरकर यांनी सांगितले. तर जोगेश्वरी पूर्व येथील रामनाथसिंह सोसायटीने प्रातिनिधीक स्वरुपात फक्त टिळा लावून होळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. होळी आनंदाचा सण आहे यामध्ये आपण आपल्यातील र्दुगुणांचा नाश करुन विकासाच्या मार्गाने पाऊले उचलण्याची गरज आहे. होळीमध्ये धांगडधिका करीत मोठय़ा प्रमाणात पाणी वाया घालविले जाते, मात्र यंदाचे दुष्काळी चित्र मनाला चटका लावणारे आहे, त्यामुळे होळी पाण्याशिवाय साजरी करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे रामनाथसिंह सोसायटीचे सदस्य दिनेश लाड यांनी सांगितले.
अंधेरीच्या चंद्रशेखर गृहसंकुलातील रहिवासीदेखील होळी साजरी करताना पाण्याचा वापर करणार नाही. सहा इमारती असलेल्या या गृहसंकुलात सदस्यांनी पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला असल्याचे सोसायटीचे सचिव आनंद बापट यांनी सांगितले. यावेळी आम्ही कोरडी होळी खेळणार असून ग्रामीण भागांमध्ये पिण्यासाठी पाण्याच्या टॅंकरची वाट पाहावी लागते तर कित्येक शेतकरी पावसाअभावी आत्महत्या करीत आहेत. मात्र आपण पाणी वाचविण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करण्याची गरज असून सर्वच सोसायटय़ांनी कोरडी होळी खेळून पाणी वाचवाची मोहिम राबविण्याची गरज आहे असे चंद्रशेखर सोसायटीचे सचिव आनंद बापट यांनी सांगितले.