मुंबईः विक्रोळी येथे पूर्व द्रूतगती महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला धडकून ४५ वर्षीय दुचाकीस्वाराला मृत्यू झाला आहे, तर दुचाकीर बसलेला १८ वर्षांचा तरूण गंभीर जखमी झाला. हा कंटेनर चढणीवर उभा करण्यात होता, त्यामुळे दुचाकीस्वाराला वाहन उभे असल्याचे समजले नाही. त्यामुळे हा अपघात झाला. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात निष्काळजीपणाचा, तसेच मोटरवाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
सहाय्यक फौजदार नरेश मगर यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारीनुसार, रविवारी मध्यरात्री त्यांना एमडीटी टॅब प्रणालीवर नियंत्रण कक्षाकडून दूरध्वनी प्राप्त झाला. पूर्व द्रुतगती महामार्गावरील नारायण बोधे पुलाच्या चढणीवर अपघात झाला असून तात्काळ पोलिसांची मदत हवी असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार मगर इतर सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी तेथे एक कंटेनर बंद अवस्थेत आढळला. तेथे मोटरसायकलचा अपघात झाला होता.
घटनास्थळी पोलीस पोहोचण्यापूर्वीच तेथे उपस्थितांनी जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेल्याचे मगर यांना समजले. त्यामुळे पोलीस राजावाडी रुग्णालयात पोहोचले. मोटरसायकलवरील एकाचा मृत्यू झाल्याचे आणि दुसरा गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांना रुग्णालयात समजले. भरत मांगीलाल जैन (४५) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत दुचाकीवर असलेला जय शंकर जैन (१८) गंभीर जखमी झाला असून कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी चेंबूर येथील झेन रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.
चालकाने कंटेनर रस्त्यावर उभा केला होता. कंटेनर चालकाने तेथे कोणतेही धोका दर्शन चिन्ह लावले नव्हते. त्यामुळे मोटरसायकस्वार कंटेनरला धडकली. दोघेही दुचाकीस्वार खाली कोसळले, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले. त्यापैकी भरत जैनला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर जय गंभीर जखमी आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात निष्काळजीपणाचा व मोटरवाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.