मुंबई : भरवेगात धावणाऱ्या एका डंपरच्या धडकेने खासगी कंपनीतील व्यवस्थापकाचा मृत्यू झाला. घाटकोपर – मानखुर्द जोड रस्त्यावर हा अपघात घडला. अपघातानंतर आरोपी डंपर चालक पोलीस ठाण्यात शरण आला असून याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. आरोपी चालकाची जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
सुभाष रघुवीर डुलगच (४७) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते विलेपार्ले येथील रहिवासी होते. ते अंधेरी पूर्व येथील एका खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. शिवाजीनगरकडून छेडानगरच्या दिशेने जात असताना घाटकोपर – मानखुर्द जोड रस्त्याच्या दक्षिण वाहिनीवर हा अपघात झाला.
चकाला परिसरातील कार्यालयात शनिवारी ते दुचाकीवरून जात होत. त्यावेळी चेंबूर येथील आश्रय रेसिडेन्सी ॲण्ड लॉजिंग समोर त्यांच्या दुचाकीला डंपरने मागून धडक दिली. त्यामुळे सुभाष हे दुचाकीवून खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केले. त्यांच्या ओळखपत्रावरून पोलिसांनी सुभाष यांचा भाऊ संजय डुलगच यांना अपघाताबाबत माहिती दिली. त्यानुसार सर्व कुटुंबिय घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात पोहोचले. तेथे गेल्यावर सुभाषचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली. दरम्यान, सुभाष सकाळी कार्यालयातील काम करुन चेंबूर येथील कंपनीच्या कामासाठी एका ठिकाणी गेला होता. तेथे जाताना त्यांच्या दुचाकीला डंपरने मागून धडक दिल्याचे पोलिसांनी संजयला सांगितले. त्यानंतर संजयने तात्काळ याप्रकरणी तक्रार केली.
दुसरीकडे अपघातानंतर आरोपी डंपरचालक गोविंदा चव्हाण स्वत: टिळकनगर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी संजय डुलगच याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गोविंदा चव्हाण याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून सुभाष यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याला अटक केली. अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.
गेल्या १५ वर्षांपासून सुभाष अंधेरीतील कंपनीत काम करीत होते. त्यांच्या पश्चात दोन मुले व पत्नी असा परिवार आहे. डुगलज कुटुंबिय विलेपार्ले येथील चाळीत राहतात. तेथे सुभाष व संजय या दोघांचीही कुटुंब एकत्र घरात राहत होती. याप्रकरणानंतर घटनास्थळावरील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्याद्वारे तपास सुरू आहे.