मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास हाती घेतला आहे. या पुनर्विकासासाठी मुंबई मंडळाने स्वत:च्या तिजोरीतून मोठा निधी खर्च केला आहे. परिणामी, मंडळावर मोठा आर्थिक भार आला असून प्रकल्पासाठी निधीची चणचण भासू लागली आहे. त्यामुळे आता मंडळाने ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतील विक्री घटकामधीलल दोन व्यावसायिक भूखंडांचा ई लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या ई लिलावातून मुंबई मंडळाला किमान ८०० कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. हा निधी उपलब्ध झाल्यास प्रकल्पातील आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावला जात आहे. या तिन्ही पुनर्विकास प्रकल्पात सध्या पुनर्वसित इमारतींची कामे सुरू असून वरळीतील पहिल्या टप्प्यातील ५५६ घरांचा ताबा लवकरच दिला जाणार आहे. हा प्रकल्प मुंबई मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येत असून या प्रकल्पाचा खर्च मंडळाच्या तिजोरीतून करण्यात येत आहे. मुंबई मंडळाने शहरातील अनेक प्रकल्प हाती घेतले असून त्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. तसेच बीडीडी प्रकल्पांवर आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला असून यापुढेही मोठ्या प्रमाणावर निधी लागणार आहे.
या प्रकल्पासाठीच्या खर्चाची वसुली विक्री घटकातील घरांच्या, अनिवासी गाळ्यांच्या विक्रीतून केला जाणार आहे. मात्र ही घरे, गाळे बांधून विक्री करण्यास बराच वेळ आहे. त्यामुळे प्रकल्पातील आर्थिक चणचण कशी दूर करायची असा प्रश्न मंडळासमोर होता. ही बाब लक्षात घेऊन मंडळाने ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव प्रकल्पांतील विक्री घटकातील दोन व्यावसायिक भूखंडाचा ई लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी बुधवारी इच्छुकांकडून निविदा मागविण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुकांना शुक्रवारपासून ई लिलावासाठी संगणकीय पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.
नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील भूखंडाची विक्री करण्यासाठी मंडळाने राज्य सरकारकडे परवानगी मागितली होती. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने ई लिलावाचा निर्णय घेऊन निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यानुसार नायगाव येथील १८०० चौ. मीटर आणि ना. म. जोशी मार्ग येथील २१०० चौ. मीटर व्यावसायिक भूखंडांचा एफएसआयसह ई लिलाव करण्यात येणार आहे. नायगावमधील भूखंडासाठी ३७१ कोटी रुपये, तर ना. म. जोशी मार्ग येथील भूखंडासाठी ४२० कोटी रुपये अशी बोली निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे या ई लिलावातून किमान ८०० कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. हे भूखंड ९० वर्षांच्या भाडेतत्त्वावर संबंधित निविदाकारास दिले जाणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या ई लिलावातून ही रक्कम उपलब्ध झाल्यास बीडीडी प्रकल्पातील आर्थिक अडचणी दूर होतील आणि प्रकल्प आणखी वेग घेईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.