मुंबई : स्तनाचा कर्करोग हा महिलांमध्ये आढळणारा एक गंभीर आजार आहे. पण वेळेत निदान झाल्यास यावर यशस्वी उपचार शक्य आहेत. ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात नुकतेच डिजिटल मॅमोग्राफी मशीन कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे आता स्तनाच्या कर्करोगासाठी आवश्यक असलेली तपासणी करण्यासाठी मुंबईतील खाजगी रुग्णालयांमध्ये धावपळ करण्याची गरज भासणार नाही.
या नव्या सुविधा विभागाचे उद्घाटन मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत रोकडे, डॉ. सचिन घोलप, डॉ. अविनाश पडळकर, आदी विविध विभागप्रमुख आणि आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. मॅमोग्राफी ही एक खास प्रकारची एक्स-रे तपासणी आहे जी स्तनांमध्ये होणारे बदल, गाठी किंवा कर्करोगाचे प्रारंभिक संकेत ओळखण्यास मदत करते. ही संपूर्ण प्रक्रिया काही वेळेतच पूर्ण होते आणि यामध्ये फारसा त्रास होत नाही.
सामान्यतः ५० ते ७४ वयोगटातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त असतो. या वयोगटातील महिलांनी दर दोन वर्षांनी मॅमोग्राफी करून घ्यावी, असे आरोग्य तज्ज्ञ सुचवतात. ४० ते ४९ वयोगटातील महिलांनी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणीचे अंतर व गरज ठरवावी.
या मॅमोग्राफी यंत्रामुळे आता ठाणे आणि परिसरातील महिलांना योग्य वेळेत व कमी खर्चात स्तन कर्करोगाची तपासणी मिळणार आहे. पूर्वी अशा तपासणीसाठी महिलांना खाजगी अथवा मुंबईतील रुग्णालयात जावे लागे, जे वेळखाऊ आणि खर्चिक होते. आता ही सुविधा शासकीय रुग्णालयात उपलब्ध झाल्याने सामान्य महिलांनाही तत्काळ व मोफत तपासणीचा लाभ घेता येईल असे ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार यांनी सांगितले.