मुंबई : प्रदुषणाला आळा घालण्यासाठी निर्मिती करण्यात येणाऱ्या पर्यावरणस्नेही फटाक्यांवर आवाजाची पातळी आणि क्यू आर कोड नमुद नसल्याची बाब चेंबूर येथे गुरुवारी या फटाक्यांची चाचणी करताना निदर्शनास आली. नियमानुसार फटाक्यांवर आवाजाची पातळी आणि क्यू आर कोड नमुद असणे आवश्यक आहे. त्यामुळे मोठा गाजावाजा करीत विकण्यात येत असलेले पर्यावरणस्नेही फटाकेही घातकच असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरवर्षी दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता नियंत्रणात ठेवण्यासाठी विक्रीस ठेवलेल्या पर्यावरणस्नेही फटाक्यांच्या आवाजाची चाचणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज ‘फाउंडेशन’च्या वतीने करण्यात येते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने चेंबूर येथील ‘आरसीएफ’ मैदानात गुरुवारी विविध फटाक्यांच्या आवाजाची पातळी मोजली. तसेच या फटाक्यांमधील रसायनांची ‘आवाज फाउंडेशन ‘तर्फे तपासणी करण्यात आली.
या तपासणीदरम्यान अनेक फटाक्यांवर आवाजाच्या पातळीचा उल्लेख नसल्याचे, तसेच काही फटाक्यांवर क्यू आर कोड नसल्याचे निदर्शनास आहे. आवाजाची पातळी किंवा क्यू आर कोड नमुद नसलेल्या फटाक्यांची बाजारात विक्री करण्यास नियमानुसार बंदी आहे.
एका फटाक्यासाठी १२५ डेसिबल इतकी आवाज मर्यादा आहे. यंदा केलेल्या फटाक्यांच्या चाचणीचा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आवाज फाउंडेशनला दिलेला नाही. त्यामुळे फटाक्यांचा आवाज किती डेसिबल आहे हे सांगता येत नसल्याचे आवाज फाउंडेशनच्या सुमैरा अब्दुलअली यांनी सांगितले. तसेच यासंबंधी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संपूर्ण माहिती शुक्रवारी देण्यात येईल असे सांगण्यात आले. दरम्यान, निवासी परिसरात ५५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात ४५ डेसिबल आवाजाची मर्यादा आहे. रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत हीच मर्यादा अनुक्रमे ५० व ४० डेसिबल इतकी आहे.
गेल्यावर्षी आवाजाची पातळी मर्यादित
गेल्यावर्षी दिवाळीत केलेल्या चाचणीत सर्व फटाक्यांचा आवाज मर्यादेत असल्याचे समोर आले होते. प्रत्येक फटाक्यांचा आवाज ६० ते ९० डेसिबलदरम्यान होता. यंदा मात्र आवाजाची पातळी किती आहे याची नोंद गुरुवारी उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे फटाक्यांच्या आवाजाची पातळी समजू शकली नाही.
फटाक्यांची चाचणी का केली जाते ?
दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे वायू प्रदूषण, पर्यावरणाची होणारी हानी आणि मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये पर्यावरणस्नेही फटाके निर्मिती करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ‘नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट’ने (‘नीरी’) पर्यावरणस्नेही फटाक्यांच्या निर्मितीचे निकष निश्चित केले. तसेच, मागील काही वर्षांपासून कानठळ्या बसविणाऱ्या फटाक्यांमुळे मुंबईत ध्वनिप्रदूषणात भर पडत आहे. यामुळे, फटाक्यांचा आवाज नियंत्रणात राहावा, तसेच बाजारात पर्यावरणस्नेही फटाक्यांव्यतिरिक्त इतर कोणते फटाके उपलब्ध आहेत का, त्यात कोणते रासायनिक घटक आहेत याची तपासणी करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाउंडेशन दिवाळीपूर्वी मुंबईत फटाक्यांची चाचणी करीत आहेत.