मुंबई : बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून सायबर फसवणूक केल्याप्रकरणी सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) अहमदाबाद, जयपूर, जबलपूर आणि पुणे येथील अनेक ठिकाणी छापे टाकले. मैग्नटेल बीपीएस ॲण्ड कन्सल्टंट ॲन्ड एलएलपी या नावाने सुरू असलेल्या पुण्यातील बनावट कॉल सेंटर प्रकरणात ईडीने ही कारवाई केली.

या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांना ‘डिजिटल’ अटक करण्याची भीती दाखवून फसवणूक करण्यात येत होती. या छाप्यात ईडीने सव्वा कोटी रुपयांची चादी, सोने आणि सव्वानऊ कोटी रुपयांच्या मालमत्तेशी संबंधीत कागदपत्रे जप्त करण्यात आली. तसेच याप्रकरणी जयपूर येथून दोन भागिदारांनाही अटक करण्यात आली आहे.

खराडी- मुंढवा रस्त्यावरील प्राईड आयकॉन या इमारतीच्या नवव्या मजल्यावर ‘मैग्नटेल बीपीएस ॲण्ड कन्सल्टंट’ या नावाने हे कॉल सेंटर सुरू होते. या कॉल सेंटरमध्ये १२३ कर्मचारी काम करीत होते. त्यांना दररोज सुमारे एक लाख अमेरिकन नागरिकांचा डेटा देण्यात येत होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी २०१४ मध्ये टाकलेल्या छाप्यात अमेरिकन नागरिकाना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी आठ आरोपींविरोधात पुणे सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्याच्या आधारावर मुंबई ईडी याप्रकरणी तपास करीत आहेत.

ईडीच्या प्राथमिक तपासानुसार, बँकेचे प्रतिनिधी असल्याचे भासवून आरोपी कर्ज देण्याच्या बहाण्याने अमेरिकन नागरिकांची बँक खाती व इतर गोपनीय माहिती मिळवत होते. त्या माहितीद्वारे त्यांच्या खात्यांतून लाखो डॉलर्सचे रक्कम हस्तांतरित करण्यात येत होती. पुढे अमेरिकेतील सहकाऱ्यांमार्फत ही रक्कम कूटचलन वॉलेटमध्ये हस्तातरित करण्यात येत होती. ही डिजिटल रक्कम ट्रस्ट वॉलेट व एक्सोडस वॉलेटमध्ये साठवण्यात येत होती.

फसवणुकीतील रक्कम ‘अंगडिया’ प्रणालीद्वारे रोख स्वरूपात भारतात आणली जात होती. त्यातील काही रक्कम बनावट खात्यांमार्फत फिरवून कंपनीच्या खात्यात जमा केली जात होती. ती रक्कम कार्यालयाचे भाडे व सॉफ्टवेअर खरेदीसाठी वापरली जात होती. उर्वरित मोठा हिस्सा सोने, दागदागिने, वाहने व स्थावर मालमत्तांमध्ये गुंतवला जात होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या छाप्यांमध्ये सात किलो सोने, ६२ किलो चांदी, एक कोटी १८ लाख रुपयांची रोकड, अंदाजे ९ कोटी २० लाख रुपयांच्या स्थावर मालमत्तांची कागदपत्रे, तसेच या कॉल सेंटरच्या कारभाराशी संबंधित महत्त्वाचे डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात जयपूर येथून संजय मोरे आणि अजित सोनी या दोन भागीदारांना अटक करण्यात आली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे.