मुंबई : बांधकाम प्रकल्पांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडीने) बांधकाम व्यावसायिकावर मोठी कारवाई करून ३३ कोटी ८९ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली. बांधकाम व्यवसायिक जयेश विनोदकुमार तन्ना, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या सहकारी कंपन्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांवर टाच आणली असून त्यात कृषी जमीन, निवासी सदनिका व्यावसायिक गाळे आणि बंगल्यांचा समावेश आहे. ही मालमत्ता मुंबई आणि अहमदनगरमधील विविध भागांमध्ये आहे. मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली. याप्रकरणी ईडी अधिक तपास करीत आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बांधकाम व्यावसायिक जयेश विनोदकुमार तन्ना, दीप विनोदकुमार तन्ना (साई ग्रुपचे प्रवर्तक) आणि इतरांविरोधात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांखाली अनेक गुन्हे दाखल आहेत. जयेश तन्नाविरोधात एक डझनहून अधिक गुन्हे मुंबई पोलिसांकडे दाखल आहेत. त्यातील बहुतांश प्रकरणांमध्ये मुंबई पोलिसांनी आता आरोपपत्र दाखल केली आहेत. या प्रकरणांच्या आधारावर ईडीने चौकशीला सुरूवात केली होती.

ईडीच्या प्राथमिक तपासात साई ग्रुपच्या प्रवर्तकांनी पुनर्विकास प्रकल्पातील सदनिका आणि दुकान खरेदीदारांकडून घेतलेला निधी गैरप्रकारांनी वळवून स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे उघड झाले आहे. परिणामी, प्रकल्प वेळेत पूर्ण झाले नाहीत आणि सदनिकाधारक, मूळ सोसायटीचे सदस्य व गुंतवणूकदारांना एकूण ८५ कोटी ७५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. बहुतांश प्रकल्प मुंबईतील असून ते अंधेरी, डी. एन. नगर, कांदिवली आणि गोरेगाव परिसरात होते, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली.

छाप्यांमध्ये मालमत्तांची माहिती मिळाली

ईडीने आरोपींशी संबंधित मुंबईतील ९ ठिकाणी ५ मार्च २०२५ रोजी छापे टाकले होते. या कारवाईत ईडीने मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह कागदपत्रे आणि बेकायदेशीर संपत्तीचा तपशील हस्तगत केला होता. त्यात स्थावर मालमत्तांची (जमीन, बंगले आणि सदनिका तसेच भारताबाहेरील मालमत्ता) माहिती ईडीला मिळाली होती. त्याची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर ईडीकडून त्यातील काही मालमत्तांवर टाच आणण्यात आली. त्यावेळी छाप्यांदरम्यान विविध दस्तऐवज सापडले. त्यातून आरोपींनी बेकायदेशीर मिळवलेली मालमत्ता विकण्याचाही प्रयत्न केला होता, असे कागदपत्रांच्या छाननीत उघड झाले होते. छाप्यांमध्ये कागदोपत्री व डिजिटल स्वरूपातील महत्त्वाचे पुरावेही जप्त करण्यात आले. याप्रकणी ईडी अधिक तपास करीत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.