मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली होती. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) विशेष न्यायालयात अर्ज करून वाझे यांना या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यास मंजुरीही दिली होती, मात्र ईडीने ही मंजुरी नुकतीच मागे घेतली आहे.

माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवणारा अर्ज वाझे यांनी फेब्रुवारी महिन्यात ईडीकडे केला होता, मात्र त्यावर ईडीने काहीच प्रतिसाद दिला नाही. दरम्यानच्या काळात सीबीआयने देशमुखांविरोधात दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यास विशेष न्यायालयाने परवानगी दिली. त्यानंतर वाझे यांनी देशमुखांविरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातही माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दाखवली व त्याबाबतचा अर्ज विशेष न्यायालयात केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष न्यायालयाने त्याची दखल घेऊन त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश ईडीला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर ईडीने विशेष न्यायालयात अर्ज करून वाझे यांना या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यास मंजुरी दिली होती.  ईडीच्या मंजुरीनंतर विशेष न्यायालयाकडून वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यास परवानगी मिळणे शिल्लक होते, परंतु नुकतीच ही मंजुरी ईडीने मागे घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.