मुंबई : ऑनलाईन मोबाइल गेमच्या आहारी गेलेल्या एका उच्चशिक्षित तरूणाने चक्क शिक्षण सोडून चोरीचा मार्ग निवडला. रेल्वेमधील प्रवाशांचे सामान चोरून मिळणाऱ्या पैशांवर तो ऑनलाईन गेम खेळत होता. रेल्वे गुन्हे शाखेच्या विशेष कृती दलाने एका चोरीच्या प्रकरणाचा छडा लावताना या आरोपीला अटक केली. त्याच्याविरोधात विविध रेल्वे पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
गेल्या काही दिवसांपासून लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे सामान, मोबाइल आदी मौल्यवान वस्तू चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. गर्दीचा फायदा घेऊन सराईत चोर सामान लंपास करीत होते. त्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण होते. प्रवासी महेंद्र पुरी (३१) १० जुलै रोजी जोधपूर एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असताना अज्ञात चोराने गर्दीचा फायदा घेऊन त्यांची एक छोटी बॅग पळवली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठांनी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना तपास करून प्रकरणाचा छडा लावण्याचे आदेश दिले होते.
सापळा रचून आरोपी ताब्यात
मेल-एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांमध्ये चोरी करण्याची कार्यपध्दती असणाऱ्या अभिलेखावरील सराईत आरोपींचा पोलिसांनी माग काढायला सुरुवात केली. दरम्यान, एक संशयित कल्याण रेल्वे परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्याने सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. तुफेल रझा अख्तर मेमन (२५) असे या आरोपीचे नाव आहे. लांबपल्ल्याच्या मेल एक्स्प्रेस गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समानाची तो प्रथम रेकी करायचा. प्रवासी रात्री झोपल्यानंतर त्याची बॅग चोरी करून तो पुढील रेल्वे स्थानकात उतरायचा. तुफेल मेमनच्या विरोधात नाशिक रोड शहर पोलीस ठाणे, तसेच चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपीकडून कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा, कर्नाटकमधील बेल्लारी रेल्वे स्थानकातील सहा अशा एकूण सात गुन्ह्यातील मुददेमाल हस्तगत करण्यात आला. त्यात वेगवेगळ्या कंपन्यांच्या २१ मोबाइलचा समावेश आहे. इतर मुद्देमालाचा तपास सुरू आहे.
मोबाइल गेमच्या व्यसानामुळे शिक्षण सोडले
याबाबत माहिती देताना विशेष कृती दलाच्या अधिकार्यांनी सांगितले की, तुफेल रझा अख्तर मेमन (२५) मुळचा धुळे जिल्ह्यातील आहे. नीट परीक्षा उत्तीर्ण करून तो पुढील शिक्षणासाठी ठाण्याजवळील मुंब्रा येथे राहण्यासाठी आला होता. तो बीएचएमएसच्या (बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी) पहिल्या वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. त्याला ऑनलाईन गेम खेळण्याची सवय लागली होती. नंतर तो त्याच्या आहारी गेला. गेम खेळताना आवश्यक आय.डी. विकत घेण्यासाठी त्याला सतत पैशांची आवश्यकता भासू लागली. हे व्यसन पूर्ण करण्यासाठी तो रेल्वे प्रवाशांच्या समानाची चोरी करू लागला. चोरी केल्यानंतर मिळणारी रोख रक्कम, मोबाइल फोन, मौल्यवान वस्तूंची विक्री करून त्यामधून येणाऱ्या पैशांनी आरोपी गेमींगसाठी आवश्यक आयडी विकत घेत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले.
या पथकाने केली कामगिरी
पोलीस आयुक्त राकेश कलासागर, पोलीस उपायुक्त, (मध्य परिमंडळ) मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र रानमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर (गुन्हे), पोलीस निरीक्षक रोहीत सावंत, विशेष कृती दलाचे (एसटीएफ) सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत भुपेंद्र टेलर, मंगेश खाडे, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक कृष्णराव चव्हाण, रामचंद्र खुस्पे, पोलीस हवालदार प्रवीण घार्गे, सुनील कुभांर, वैभव शिंदे, वैभव जाधव, विकास रासकर, सतीश फडके, गणेश महागावकर, मयूर पाटील, अमरसिंग वळवी, सुनील मागाडे, पदमा केंजळे, हिरामन शिंदे, अविनाश विधे, पोलीस अंमलदार स्वप्नील नागरे, आकाश सोनावणे तांत्रिक शखेचे पोलीस हवालदार संदेश कोंडाळकर, विक्रम चावरेकर, पोलीस अंमलदार अनिल राठोड, अमोल अहिनवे, अनिल उपाध्याय, भगवान पाटील, डी. बी. शिंदे, पंकज पाखले व रवींद्र चौहान आदींनी सदरची कामगिरी केली.