मुंबई : राज्यामध्ये कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (सीसीआय) माध्यमातून कापूस खरेदी करण्यात येते. या खरेदीसाठी शेतकऱ्यांची किसान कपास ॲपवर नोंदणी सुरू झालेली आहे. ही नोंदणी अधिक सुलभ आणि जलद गतीने होण्यासाठी शेतकऱ्यांचा कृषी विभागाकडील ॲग्रीस्टॅक पोर्टल चा आधार संलग्न माहितीचा उपयोग आणावी, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
किमान हमीभावाने कापूस खरेदी नोंदणी आणि खरेदीच्या नियोजनासाठी मंत्रालयात पणन जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस आमदार देवराव भोंगळे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकासचंद्र रस्तोगी, पणन विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक ललित गुप्ता, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक अभय महाजन आदी उपस्थित होते.
कृषी आणि पणन या दोन्ही विभागाने समन्वय करून कापूस खरेदीची प्रक्रिया शेतकरीभिमुख, सुलभ व जलदगतीने करण्याठी नियोजन करावे. शासन हमीभाव योजना अंतर्गत सोयाबीन, तूर, हरभरा खरेदी करते. शेतकऱ्यांना कुठलीही अडचण येऊ नये, याची काळजी घ्यावी. ॲग्रीस्टॅक पोर्टलवर शेतकऱ्यांचे फॉर्मर आयडी तयार करण्यात आले आहेत.
ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नाव जमिनीचा तपशील व इतर माहिती जमा केली आहे. कृषी आणि पणन विभागाने या माहितीचा वापर करून शेतकरी कापूस खरेदी नोंदणीची प्रक्रिया गतीने पूर्ण होईल, असे रावळ म्हणाले. किसान कपास ॲपवर राज्यातील ३.२५ लाख शेतकऱ्यांनी स्वयं नोंदणी केलेली आहे. या नोंदणीची पडताळणी प्रक्रियाही तातडीने पूर्ण करावी. राज्यात १७१ सीसीआय खरेदी केंद्र उघडण्यात येणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत या खरेदी केंद्रांमध्ये वाढ करण्यात आली आहे. शेतकरी नोंदणी आणि खरेदी प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी संबंधितांनी योग्य नियोजन करून जबादारी पार पाडावी, अशा सूचनाही पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या.