मुंबई : शेतीचा कायापालट करण्यासाठी, शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी, पिकांची लवचिकता वाढवण्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने (बीएआरसी) विविध कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने व्यावसायिक लागवडीसाठी आठ नवीन पिकांचे वाण विकसित केले आहेत. यात पाच तृणधान्ये आणि तीन तेलबियांच्या वाणांचा समावेश आहे. ‘बीएआरसी’ने ७० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये आतापर्यंत ७० पीक जाती शेतकऱ्यांसाठी विकसित केल्या आहेत.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातील क्षार जमिनीसाठी ‘ट्रॉम्बे कोकण खारा’ हे तांदळाचे वाण विकसित केले आहे. या वाणामुळे खाऱ्या मातीमध्ये भातशेती करणे शक्य होणार असून भाताचे उत्पादन १५ टक्क्यांनी वाढण्यासही मदत होणार आहे. रायपूरमधील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने छत्तीसगडमधील शेतकऱ्यांसाठी ‘बौना लुचाई-सीटीएलएम’ आणि ‘संजीवनी’ हे तांदळाचे दोन वाण विकसित केले आहेत. राजस्थानच्या शुष्क परिस्थितीत चांगले उत्पादन मिळावे, यासाठी उष्णता सहन करणारे आणि बुरशीजन्य रोगांना प्रतिरोधक असलेली ‘ट्रॉम्बे जोधपूर गहू-१५३’ ही जात जोधपूर कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. ‘ट्रॉम्बे राज विजय गहू १५५’ ही जात मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरमधील राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने विकसित केली. बीएआरसीद्वारे गव्हाचे वाण विकसित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हेही वाचा : दहिसरमध्ये राडारोडा पुनर्प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित, आतापर्यंत १६ हजार मेट्रिक टन राडारोड्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया

देशांतर्गत उत्पादनातून ४०-४५ टक्के तेलबियांची गरज भागवली जाते. तेलबियांच्या उत्पादनात ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यासाठी मोहरी, तीळ आणि भुईमुगाचे उच्च उत्पन्न देणारे सुधारित वाण बीएआरसीने विकसित केले आहे. परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने गामा किरण विकिरण वापरून प्रथमच तीळाची ‘ट्रॉम्बे लातूर तीळ-१०’ ही जात विकसित केली आहे. यातून सुमारे २० टक्के अधिक उत्पन्न मिळणार आहे. राजस्थानसाठी जोधपूर कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने ‘ट्रॉम्बे जोधपूर मस्टर्ड २’ ही सध्याच्या वाणांपेक्षा १४ टक्के अधिक उत्पादन देणारे वाण विकसित करण्यात आले आहे. यात तेलाचे प्रमाण ४० टक्के आहे. रायपूरमधील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने ‘ट्रॉम्बे ग्राउंडनट ८८’ हे भुईमुगाचे नवे वाण विकसित केले आहे. त्याला ‘छत्तीसगड ट्रॉम्बे मुंगफली’ असेही नाव दिले आहे. हे वाण छत्तीसगडमध्ये पावसाळी व उन्हाळी हंगामात लागवडीसाठी योग्य आहे.

हेही वाचा : वास्तुरचनाकार – नियोजनकार शिरीष पटेल यांचे निधन

स्थानानुसार विशिष्ट सुधारित पीक वाणांचे उत्पादन करण्यासाठी अणू ऊर्जा विभागाचे राज्य कृषी विद्यापीठांशी सहकार्य करण्याची वचनबद्धता या संशोधनातून स्पष्ट होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
डॉ. अजित कुमार मोहंती, अध्यक्ष (अणुऊर्जा आयोग)

नवे वाण हे लवकर परिपक्व, रोग प्रतिरोधक, हवामान प्रतिरोधक, क्षार सहनशील आणि अधिक उत्पादन देणारे आहे. सध्याच्या बियांणांपेक्षा नवे वाण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरतील.

विवेक भसीन, संचालक (बीएआरसी)