scorecardresearch

“मी, एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की…”; महाराष्ट्रात ‘शिंदे’शाहीची सुरुवात, फडणवीस उपमुख्यमंत्री

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

Eknath Shinde Oath Ceremony
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना एकनाथ शिंदे

Maharashtra New CM Eknath Shinde Oath Ceremony : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोघांनाही आपल्या पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. यात केंद्रीय मंत्री भागवत कराड, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे इत्यादी नेत्यांचा समावेश आहे.

एकनाथ शिंदे शपथ घेण्यासाठी राजभवन सभागृहाच्या मंचावर आले तेव्हा शिंदे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या नावाचा उल्लेख केला. यावेळी शिंदे समर्थकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. स्वतः एकनाथ शिंदे यांना शपथ घेताना समर्थकांना शांत बसण्यास सांगावं लागलं.

शपथविधी सोहळा पाहा :

मोदी-शाहांकडून फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचे निर्देश

भापजा नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे राज्याच्या नवे मुख्यमंत्री असतील, भाजपा पक्षाचा या सरकारला पाठिंबा असेल, अशी घोषणा घोषणा केली होती. तसेच ही घोषणा करताना मी या सरकारचा भाग नसेन, मात्र या सरकारची माझ्यावर जबाबदारी असेन, असेही फडणवीस यांनी जाहीर केले होते. मात्र फडणवीसांच्या या घोषणेनंतर भाजपच्या दिल्लीमधील शीर्ष नेतृत्वाने वेगळी भूमिका मांडली आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री होतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केले.

अमित शाह काय म्हणाले?

अमित शाह म्हणाले, “भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी विनंतीवरून देवेंद्र फडणवीस यांनी मोठं मन केलं. तसेच महाराष्ट्र राज्य आणि जनतेच्या हितासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या प्रती त्यांची खरी निष्ठा आणि सेवाभाव दाखवतो. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.”

भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा काय म्हणाले?

भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले, “भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीसांनी देखील नव्या राज्य सरकारचा भाग बनावं असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्विकारावं असं केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं आहे. मी देखील त्यांना व्यक्तिगत विनंती केली आहे.”

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eknath shinde take oath as cm devendra fadnavis as deputy cm in mumbai pbs

ताज्या बातम्या