मुंबई : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या नुकत्याच झालेल्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान राज्यात १ लाख ६६ हजार ७४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जवळपास २२ हजारांपेक्षा जास्त जागा वाढल्या असून त्याचा प्रवेश प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.

मात्र यंदा मागील तीन वर्षांच्या तुलनेत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रवेश वाढले असून विद्यार्थांचा सर्वाधिक कल हा यंदाही संगणक अभियांत्रिकी, यांत्रिकी अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन या अभ्यासक्रमांसह नव्याने सुरू झालेल्या कृत्रिम अभिव्यक्ती, विदाशास्त्र या अभ्यासक्रमांकडे अधिक असल्याचे दिसते.

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत असली तरी जागा रिक्त राहण्याचे प्रमाण अधिक होते. त्यातच यंदा अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी २२ हजार ७१३ नवीन जागांना मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता २ लाखांवर पोहचली होती. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने अभियांत्रिकी अभ्यासक्रमासह विभागीय स्तरावर घेतलेल्या मार्गदर्शन शिबिरामुळे यंदा अभियांत्रिकीच्या प्रवेशामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

पहिल्या फेरीमध्ये ३४ हजार ९३१, दुसऱ्या फेरीमध्ये २९ हजार ९१०, तिसऱ्या फेरीमध्ये ३० हजार ४१२ तर चौथ्या फेरीमध्ये ३५ हजार १५५ प्रवेश झाले. संस्थात्मक स्तरावर ३६ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने यंदा तब्बल १ लाख ६६ हजार ७४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. मागील तीन वर्षांतील हे सर्वाधिक प्रवेश ठरले आहेत. त्यामुळे यंदा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जागा वाढल्या असल्या तरी प्रवेशामध्येही वाढ झाल्याचे दिसून येते.

पुण्यात सर्वाधिक प्रवेश

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या १ लाख ६६ हजार ७४६ विद्यार्थांपैकी पुणे विभागामध्ये सर्वाधिक ७० हजार २५१ विद्यार्थांनी प्रवेश घेतले. त्याखालोखाल मुंबईतून ३१ हजार ९३०, नाशिक २३ हजार १२२, नागपूर २० हजार ९८७, औरंगाबाद ११ हजार २९९ आणि अमरावतीमध्ये सर्वाधिक कमी ९ हजार १५७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.

मुलींच्या संख्येत वाढ

गतवर्षीच्या तुलनेत प्रवेशित मुलांच्या संख्येत यंदा घट झाली असली तरी मुलींच्या संख्येत वाढ झाली आहे. गतवर्षी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला ६४.६१ टक्के मुलांनी प्रवेश घेतले होते. यंदा ६२.७० टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने जवळपास दोन टक्क्यांनी घट झाली आहे. त्याचप्रमाणे गतवर्षी ३५.३८ मुलींनी प्रवेश घेतले होते. यंदा त्यात वाढ होऊन ३७.३० टक्के मुलींनी अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतले आहेत.

या अभ्यासक्रमांना पसंती

कॉम्प्युटर इंजिनिअरिंग २७ हजार ९९५, मॅकेनिकल इंजिनिअरिंगला १७ हजार ११५, इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग १७ हजार ८७८, कॉम्प्युटर सायन्य ॲण्ड इंजिनिअरिंग १७ हजार ६५०, सिव्हिल इंजिनिअरिंग १२ हजार ४१५, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी १५ हजार १७८, इलेक्ट्रिकल इंजनिअरिंग ९ हजार ९१० आणि आर्टिफिशियल इंजिनिअरिंग ॲण्ड डाटा सायन्सला ८ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत

तीन वर्षातील प्रवेशाची आकडेवारी

वर्षजागाप्रवेश रिक्त जागा
२०२३-२४१५८५८५ ११८०३७ ४०५४८
२०२४-२५ १८०१७० १४९०७८ ३१०९२
२०२५-२६२०२८८३ १६६७४६ ३६१३७