मुंबई : आरे वसाहतीमधील आदिवासी आणि पर्यावरणप्रेमींनी शनिवारी झाडांना राखी बांधून आगळावेगळे रक्षाबंधन साजरे केले. विशेष म्हणजे या राख्या पर्यावरणपूरक असून, हाताने तयार केल्या होत्या. प्रत्येक राखीवर पर्यावरण रक्षणाचे संदेश लिहिले होते. या ‘वृक्षबंधन’ उपक्रमातून निसर्गाच्या संरक्षणासाठी समाजाने पुढे यावे, हा संदेश देण्यात आला आहे.
आरे जंगलाचा ऱ्हास थांबविण्यासाठी स्थानिक रहिवासी, तसेच पर्यावरणप्रेमी नेहमीच प्रयत्न करीत असतात. मात्र परिस्थिती जैसे थे आहे. याआधी आरेमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली होती. या भागात काही प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. हे असेच सुरू राहिले तर आरे जंगलच नष्ट होईल. जंगलाचा ऱ्हास होऊ नये यासाठी पर्यावरणप्रेमी, तसेच स्थानिक आदिवासी सतत प्रयत्नशील आहेत. यासाठी जनजागृती करण्यात येते.
दरम्यान, ‘युथ फॉर आरे फॉरेस्ट’च्या सह-संस्थापक अपर्णा बांगिया, स्थानिक रहिवासी वनिता ठाकरे यांनी ‘वृक्षबंधन’ उपक्रम राबविला. यावेळी शाळेतील विद्यार्थीही उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही झाडांना राख्या बांधल्या. या राख्यांवर पर्यावरण रक्षणाचे संदेश लिहिले होते. या राख्या रतन कुंजच्या बिया, कराडूची फुले आणि आंब्याच्या पानांपासून तयार करण्यात आल्या आहेत. दरम्यान, यावेळी प्रमिला भोईरही उपस्थित होत्या. मेट्रो ३ कारशेडसाठी आरेमधील झाडे तोडण्यात आली, तेव्हा भोईर यांनी विरोध केला होता. यावेळी त्यांना तुरुंगातही जावे लागले होते.
आदिवासींनी बनवल्या राख्या
आरेमध्ये झाडांना बांधण्यात आलेल्या राख्या पर्यावरणपूरक आहेत. या राख्या तेथील स्थानिक आदिवासींनी बनवल्या आहेत. यामध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला आहे.