मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदाही गोड होणार आहे. महापालिका प्रशासनाने पालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीनिमित्त तब्बल ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

गेल्या काही आठवड्यांपूर्वी कर्मचारी संघटनांनी यंदा दिवाळीसाठी महानगरपालिका कर्मचाऱ्यांना वाढीव सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती. त्यानुसार सानुग्रह अनुदानाचा क्रम, तपशील आणि सानुग्रह अनुदान रक्कम नुकतीच जाहीर झाली आहे. महानगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली.

अनुदान प्राप्त खासगी प्राथमिक शाळा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महानगरपालिका प्राथमिक शाळेतील, तसेच अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षण सेवक, माध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित/विनाअनुदानित), माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित/विनाअनुदानित), अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते / शिक्षकेतर कर्मचारी- (अनुदानित/विनाअनुदानित), अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित/विनाअनुदानित) आदींना ३१ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झाले आहे. तसेच, भाऊबीज म्हणून सामाजिक आरोग्य स्वयंसेविकांना १४ हजार रुपये, तर बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांना ५ हजार रुपये भेट स्वरूपात देण्यात येणार आहेत.

महानगरपालिकेच्या विविध खात्यातील कर्मचारी – कामगारांना दिवाळीनिमित्त दिल्या जाणाऱ्या सानुग्रह अनुदानाची ओढ लागली होती. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील सर्वच कर्मचारी संघटनांनी मागील वर्षाच्या तुलनेत सानुग्रह अनुदान वाढवून देण्याची मागणी केली होती.