मुंबई: कुर्ला परिसरात २७ वर्षीय तरुणीची अश्लील छायाचित्रे तयार करून त्या आधारे तिच्याकडून खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर साकिनाका पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

फिर्यादी तरूणी २७ वर्षांची असून ती कुर्ला परिसरात राहते. तिची आरोपी सुलेमान खान (२४) याच्याशी ओळख होती. आरोपी सुलेमान याने फिर्यादी तरूणीच्या मैत्री वाढवली आणि जवळीक निर्माण केली. दरम्यान जानेवारी महिन्यात आरोपी सुलेमान याने पीडित तरूणीशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यावेळी आरोपीने पीडितेच्या नकळत तिची अश्लील छायाचित्रे काढली होती. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फिर्यादी तरूणीला फिरोज खान (१८) नामक तरूणाचा फोन आला. तो आरोपी सुलेमान याचा मित्र होता. त्याच्याकडे या पीडितेची अश्लील छायाचित्रे होती. ती प्रसारित करण्याची त्याने धमकी दिली.

अश्लील छायाचित्रांच्या आधारे खंडणी

छायाचित्रे प्रसारित न करण्यासाठी त्याने तिला धमकाविण्यास सुरवात केली. या छायाचित्रांच्या आधारे त्याने पीडित तरुणीकडून ३२ हजार रुपयांची खंडणी वसूल केली. त्यानंतर सुलेमान आणि फिरोज हे दोन्ही आरोपी पीडित तरुणीला प्रत्यक्ष आणि समाज माध्यमांवर त्रास देऊ लागले होते. पीडित तरुणीने त्यांना पैसे देणे बंद केले तसेच शरीरसंबंधास नकार दिला. त्यामुळे दोन्ही आरोपींनी पीडित तरुणीची अश्लील छायाचित्रे प्रसारित केली.

दोघांना अटक

याप्रकरणी साकिनाका पोलीस ठाण्यात बलात्कार, धमकी, विनयभंग केल्याप्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या कलम ६४ (१), ३०८ (१), ७८, ३५१ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना साकिनाका पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी पीडित महिलेच्या घराजवळील परिसरात राहणारे आहेत. ते दोघेही बेरोजगार आहेत. त्यांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून मोबाईल पुढील तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती साकिनाका पोलिसांनी दिली.

यापूर्वीच्या घटना

अंधेरी

अश्लील छायाचित्रांच्या आधारे खंडणी मागण्याचे प्रकार वाढत आहेत. जुलै महिन्यात अंधेरी येथे राहणार्या २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीला अश्लील छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करून सुमारे अडीच लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली होती. या प्रकरणी तरूणीचा माजी प्रियकर आणि त्याच्या मित्राविरोधात डि. एन. नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली होती.

मिरा रोड

मिरा रोड मध्ये राहणाऱ्या १७ वर्षांय तरूणीची जुलै महिन्यात स्नॅपचॅट या समाजमाध्यमाद्वारे राज सिंग नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. या काळात राज सिंग याने तिच्याकडे अश्लील छायाचित्राची मागणी केली. अजाणतेपणे तिने आपले अश्लील छायाचित्र पाठवले. नंतर आरोपी राज सिंग त्याच्याकडे अश्लील व्हिडियोची मागणी करू लागला. मात्र तिने त्याला नकार दिला. यासाठी त्याने पीडितेकडे पैशांची मागणी केली. नंतर ही छायाचित्रे त्याने प्रसारित करून तिची बदनामी केली.