मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी लालबाग – परळ – गिरगावात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने लालबागचा राजा, जीएसबी मंडळांनी पुढाकार घेत फेस डिटेक्टर ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती पाहण्यासाठी देशभरातून लाखो भाविक मुंबईत दाखल होतात. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा सम्राट, मुंबईचा राजा, राजा तेजुकायाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत असते. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मागणी काही वर्षांपासून केली जात आहे. सध्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव समितीने ‘फेस डिटेक्टर’ ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. अन्य मंडळांमध्ये मेटल डिटेक्टर व अन्य यंत्रणा लावण्यात आली आहेत.
लहान मंडळांसाठी खर्च अधिक
फेस डिटेक्टर ही यंत्रणा प्रचंड महाग असल्याने छोट्या मंडळांना ते परवडत नाही. तसेच, यंत्रणा कुठून विकत घ्यायची, कशी हाताळायची, भाड्याने मिळते का याबाबतही मंडळांमध्ये अनभिज्ञता आहे. त्यामुळे या यंत्रणेचा फारसा विचार केला जात नाही, असे परळ विभाग सार्वजनिक ट्रस्टचे विश्वस्त मिनार नाटळकर यांनी सांगितले. आर्थिकदृष्टया सक्षम असलेल्या मंडळांना ही यंत्रणा बसविणे अवघड नाही. मंडळात भाडेतत्त्वावर मेटल डिटेक्टर यंत्र आणण्यात आले होते. मात्र, दोन – तीन दिवसांपूर्वी त्यात बिघाड झाल्याने ते पुन्हा पाठवले, अशी माहिती खेतवाडीतील मुंबईचा सम्राट ६ वी गल्लीचे किरण शिंदे यांनी दिली. सुरक्षेच्या दृष्टीने मंडळात ५४ सीसीटिव्ही कॅमेरे, ८ मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. मात्र, फेस डिटेक्टर यंत्रणा उभारण्यात आलेली नाही, असे मुंबईचा राजा मंडळातर्फे सांगण्यात आले.
फेस डिटेक्टर तंत्रज्ञानाचा फायदा काय?
फेस डिटेक्टर हे तंत्रज्ञान आज जगभरात सुरक्षा व्यवस्थेसाठी वापरले जात आहे. संशयित व्यक्तींचा शोध घेणे, गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे किंवा गर्दीतून धोका निर्माण करू शकणाऱ्यांची ओळख पटवणे यासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरते. काही मोठ्या उत्सवांमध्ये, रेल्वे स्थानकांवर, विमानतळांवर हे तंत्रज्ञान वापरले जाते.
डेटा संकलन करणे मंडळांसाठी कठीण
फेस डिटेक्शनमध्ये व्यक्तीचा चेहरा हा बायोमेट्रिक डेटा म्हणून नोंदवला जातो. या डेटाचा गैरवापर होऊ नये, यासाठी कठोर नियम आहेत. अशा डेटाचे संकलन व साठवणूक करण्याची जबाबदारी घेणे मंडळांसाठी कठीण होते. तसेच, परवानगीची प्रक्रियाही वेळखाऊ असते. त्यामुळेही सर्रास सर्व मंडळे या यंत्रणेचा वापर करत नाहीत. परंतु आता हळूहळू सुरक्षेच्यादृष्टीने फक्त व्यवस्थेवर अवलंबून न राहता मंडळे स्वत°च सुरक्षेसाठी सतर्क झाली आहेत.