मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) २०१३ मधील बनावट नोटांच्या चार गुन्ह्यांत फरार असलेला प्रमुख आरोपी मोईदीनअबा उमर बेरी उर्फ मोईदीनला तब्बल १२ वर्षांनंतर अटक केली. यूएईहून प्रत्यार्पण प्रक्रियेनंतर आरोपीला शुक्रवारी मुंबई विमानतळावर ताब्यात घेण्यात आले.

मोईदीन हा बनावट नोटांसंबंधी चार गुन्ह्यांमधील मुख्य आरोपी आहे. तो २०१५ पासून यूएईच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या ताब्यात होता. प्रत्यार्पण प्रक्रियेनंतर शुक्रवारी दुबईहून त्याला मुंबई विमानतळावर आणण्यात आले. तेथे एनआयएच्या पथकाने त्याला अटक केली. त्यानंतर त्याला केरळमधील कोची येथे एनआयए विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.

एनआयएने २०१३ मध्ये त्याचे भारतीय पारपत्र रद्द केले होते. त्यानंतर इंटरपोलद्वारे त्याच्याविरोधात रेड नोटीस जारी करण्यात आली होती. त्याच वर्षी कासारगोड जिल्ह्यातील चार वेगवेगळ्या ठिकाणांवरून बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या, त्या प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. यूएईत २०१५ मध्ये तो सापडला आणि त्याला अटकही झाली. त्यानंतर एनआयएने त्याच्या प्रत्यार्पणासाठी यूएई सरकारकडे अधिकृत विनंती केली होती. यूएईने १९ जून २०२५ रोजी आरोपीला भारताच्या ताब्यात दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील रहिवासी असलेला मोईदीनने इतर आरोपींसोबत संगनमत करून यूएईमधून ३१ लाख रुपयांच्या बनावट नोटा मिळविल्या. हे बनावट चलन दुसरा आरोपी उस्मान याने बंगळुरू विमानतळावरून भारतात आणले. त्यानंतर कासारगोड परिसरात वितरित करण्यात आले, असे तपासात उघड झाले होते. या प्रकरणात एनआयएने आतापर्यंत मोईदीनसह सहा आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.