मुंबई : कमी किंमतीत अमेरिकन डॉलर देण्याचे आमिष दाखवून एका इसमाची दोघांनी अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना मुलुंड येथे समोर आली आहे. फसवणूक झालेल्या इसमाच्या तक्रारीवरून नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस सीसीटीव्ही चित्रणाच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहेत.

चेंबूरच्या गव्हाणपाडा येथे राहणारे इर्शाद मुस्तफा (५१) यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्याच एका ओळखीच्या व्यक्तीने फोन केला. घरकाम करणाऱ्या एका महिलेला मोठ्या प्रमाणात अमेरिकन डॉलर सापडले आहेत. मात्र या महिलेला त्या डॉलरबाबत काहीही समजत नसल्याने ते कमी किंमतीत विकायचे असल्याचे त्याने सांगितले. दहा लाख रुपये किंमतीचे अमेरिकन डॉलर अवघ्या अडीच लाखात मिळत असल्याने तक्रारदार यांनी तत्काळ त्या व्यक्तीला डॉलर घेऊन भेटण्यास सांगितले. त्यानुसार बुधवारी मुलुंड पूर्वेला असलेल्या उड्डाणपुलाखाली आरोपी तक्रारदार यांना भेटण्यासाठी आले.

पिशवीत अमेरिकन डॉलर असल्याची खात्री झाल्यानंतर तक्रारदार यांनी तात्काळ आरोपींना अडीच लाख रुपये दिले. त्यानुसार आरोपींनीही डॉलरची पिशवी त्यांच्याकडे देत तात्काळ पोबारा केला. त्याचवेळी तक्रारदार यांनी पिशवी उघडून पहिली असता त्यात केवळ कागदाचे बंडल मिळाले. तक्रारदार यांनी आरडाओरडा करून काही वेळ आरोपींचा पाठलाग केला. मात्र त्यांनी तोपर्यंत पोबारा केला. याबाबत तक्रारदार यांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.