मुंबई: भायखळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) माजी तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्या हत्येप्रकरणी कुटुंबिय उपोषणाला बसले आहेत. याप्रकरणी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोक्का) गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. पण मुख्य आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याचा आरोप कुटुंबिनी केला आहे. तसेच तत्कालीन दोन पोलिसांनी पुरावे नष्ट केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.सचिन कुर्मी यांची ऑक्टोबर २०२४ मध्ये हत्या झाली होती. या हत्येचा मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट असून त्याला अटक झालेली नाही, असा आरोप सचिन कुर्मी यांच्या कुटुंबीयांनी केला होता.
मुख्य आरोपीला अटक न झाल्यामुळे कुर्मी कुटुंबिय १ मेपासून उपोषणाला बसले आहेत. यावेळी कुटुंबियांकडून स्थानिक माथाडी नेत्यावर आरोप करण्यात आले आहेत. तसेच भाजपचा नेता व शिवसेनेच्या (शिंदे) स्थानिक नेत्यावरही कुटुंबियांनी आरोप केले आहेत. तसेच दोन पोलिसांनी या प्रकरणात पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोपही कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.
सचिन कुर्मी हे भायखळ्यातील म्हाडा कॉलनी येथे गेले असताना, काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले, तेव्हा कुर्मी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांनी त्यांना तत्काळ आपल्या गाडीतून जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींसह आणखी चार आरोपींचा हत्येत सहभाग असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. तसेच त्यांना वरिष्ठ नेत्यांनी मदत केल्याचा आरोपही कुटुंबियांकडून करण्यात आला.