मुंबई : नागरिकांना भेसळविरहित दूध मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी पहाटे मुंबईच्या तीन प्रवेशद्वारांवर दूध तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेंतर्गत मुंबईमध्ये येणाऱ्या जवळपास १ लाख ५० हजार लिटर दुधाच्या साठ्याची तपासणी करण्यात आली. यामध्ये विविध नामवंत कंपन्यांच्या दुधाची पाकिटे, पिशवीबंद दूध, व सुट्या स्वरुपातील एकूण १०८ दुधाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. या नमुन्यांचे अहवाल प्राप्त होताच कायदयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईमध्ये दुधाच्या भेसळीची प्रकरणे उघडकीस येत आहेत. त्यामुळे भेसळयुक्त दूध वितरित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली १ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून २ एप्रिलच्या पहाटेपर्यंत शहराच्या तीन प्रवेशद्वारांवर दूध तपासणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मानखुर्द चेक नाका, दहिसर चेक नाका आणि ऐरोली चेक नाका या तीन प्रवेशद्वारांवरून शहरात प्रवेश करणाऱ्या दुधाच्या टँकरची तपासणी करण्यात आली.

तिन्ही प्रवेशद्वारावरून शहरात प्रवेश करणाऱ्या ७९ वाहनांमधील १ लाख ५१ हजार ८९४ लिटर इतका दुधाचा साठा तपासण्यात आला. यामध्ये विविध नामवंत कंपन्यांची दुधाची पाकिटे, पिशवीबंद दूध, व सुट्या स्वरुपातील एकूण १०८ दुधाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. दहिसर चेक नाक्यावर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ स्वत: मोहिमेमध्ये सहभागी झाले हेते. तपासणीसाठी घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त होताच निकृष्ट दर्जाचा नमूना असणाऱ्या उत्पादनावर कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिली.

मानखुर्द चेक नाक्यावर सर्वाधिक तपासणी

मुंबईच्या प्रवेशद्वारांवर राबविलेल्या मोहिमेमध्ये ७९ वाहनांमधील १ लाख ५१ हजार ८९४ लिटर इतका दुधाचा साठा तपासण्यात आला. मानखुर्द चेक नाक्यावर सर्वाधिक ५१ दुधाच्या वाहनांची तपासणी करण्यात आली. या वाहनांतील एकूण १ लाख ४ हजार ५३८ लिटर इतक्या दुधाच्या साठ्याची तपासणी करण्यात आली. दहिसर चेक नाका येथे १० वाहनांमधील २७ हजार ७०४ लिटर दुधाचा साठा आणि ऐरोली चेक नाका येथे १८ वाहनांमधील १९ हजार ६५२ लिटर दुधाचा साठा तपासण्यात आला.

ठाणे विभागाच्या मदतीने कार्यवाही

बृहन्मुंबई विभागात सध्या अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे कोकण विभागाचे सह आयुक्त (अन्न) श्रीकांत करकळे यांच्या ठाणे कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मदतीने संयुक्तरित्या जकात नाका मोहीम राबविण्यात आली. जनतेस सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या मोहिमा भविष्यातही राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई विभागाचे सहआयुक्त (अन्न) मंगेश माने यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध

कोणत्याही कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक असतो. त्यामुळे दूध व दुग्धजन्य अन्नपदार्थांच्या गुणवत्ता व दर्जेबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याबाबत प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर संपर्क साधावा, असे आवाहन मंगेश माने यांनी केले आहे.