मुंबईतील मालाड परिसरात लिफ्टमध्ये अटकल्यामुळे २६ वर्षीय महिला शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शिक्षिकेचे नाव जेनेले फर्नांडीस असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील चौकशी सुरू केली आहे.

हेही वाचा >>> राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर; बैठका, चर्चा अन् बरंच काही; ‘असं’ असेल मनसेचं ‘मिशन विदर्भ’

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील मालाड पश्चिम भागात सेंट मेरी इंग्लिश स्कूल नावाची शाळा आहे. या शाळेत जेनेले फर्नांडीस जून २०२२ पासून सहाय्यक शिक्षिका म्हणून नोकरीवर होत्या. मात्र शुक्रवारी (१७ सप्टेंबर) त्यांच्यासोबत भीषण अपघात झाला. त्यांना दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना शिकवून सहाव्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जायचे होते. त्यासाठी त्यांनी लिफ्टचा वापर केला. मात्र यावेळी पूर्ण बंद होण्याआधीच लिफ्ट सातव्या मजल्यावर गेली. लिफ्ट बंद न झाल्यामुळे फर्नांडीस यांचा एक पाय बाहेरच राहिला आणि यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या.

हेही वाचा >>> ‘पुढचा नंबर आमचा तर नाही ना?’, यवतमाळ-अमरावतीमधील तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांचं गडकरींना पत्र

दरम्यान, या अपघातानंतर शाळेतील इतर शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांनी लिफ्टकडे धाव घेतली आणि फर्नांडीस यांना लाईफलाईन या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांना येथे मृत घोषित करण्यात आले. पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.